नागपूर : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांच्यातील वाद पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. चमत्कार सिद्ध केल्यास ८० लाख रुपयांचे बक्षीस देण्याच्या श्याम मानव यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देत शास्त्रींनी थेट ‘दिव्य दरबारा’त उपस्थित राहण्याचे खुले आव्हान दिले आहे. त्यावर श्याम मानव यांनी बागेश्वर बाबा खोटारडे आहेत, त्यांनी तटस्थ ठिकाणी येऊन चमत्कार सिद्ध करावे, असे म्हटले आहे.
वादाचा केंद्रबिंदू पुन्हा चर्चेत
नागपूरमध्ये सुरू असलेल्या रामकथेदरम्यान धीरेंद्र शास्त्री यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांना पुन्हा एकदा खुले आव्हान दिले आहे. याच पार्श्वभूमीवर श्याम मानव यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका अधिक कठोर करत चमत्कार सिद्ध केल्यास ८० लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा कायम ठेवली आहे. २०२३ मध्ये हे आव्हान ३० लाख रुपयांचे होते, ते आता वाढवून ८० लाख रुपये करण्यात आले आहे. या वादामुळे दोन्ही बाजूंची भूमिका अधिक टोकदार झाली आहे.
शास्त्रींचे थेट ‘दिव्य दरबार’ आव्हान
धीरेंद्र शास्त्री यांनी त्यांच्या एका प्रसारित चित्रफितमध्ये श्याम मानव यांना उद्देशून थेट आव्हान दिले आहे. “ज्यांना खाज असेल त्यांनी दरबारात यावे,” असे ते म्हणाले. “मी ३० तारखेपर्यंत येथेच आहे. नंतर कोणी म्हणू नये की बाबा पळून गेला,” असेही त्यांनी स्पष्ट केले. शास्त्री यांनी सांगितले की त्यांच्या कथेमध्ये दोन दिवस ‘दिव्य दरबार’ होणार असून इच्छुकांनी तेथे उपस्थित राहावे. त्यांच्या मते, ही सर्व प्रक्रिया त्यांच्या ईश्वरी प्रेरणेवर आधारित कार्याचा भाग आहे.
श्याम मानव यांचा कठोर पलटवार
श्याम मानव यांनी मात्र शास्त्रींचे आव्हान स्पष्टपणे नाकारले आहे. “आम्ही त्यांच्या दरबारात जाणार नाही, कारण तिथे फसवणुकीची शक्यता असते,” असे ते म्हणाले. त्यांनी स्पष्ट केले की चाचणी कोणत्याही तटस्थ ठिकाणी, विशेषतः पत्रकार भवनातच घेतली जावी. प्रस्तावित प्रयोगानुसार शास्त्रींनी दहा व्यक्तींची माहिती अचूक सांगणे आणि बंद खोलीतील वस्तू ओळखणे अपेक्षित आहे. ९० टक्के अचूकता सिद्ध झाल्यास अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम बंद करून त्यांचा भक्त होण्याचे आश्वासनही मानव यांनी दिले आहे.
अंधश्रद्धा, चमत्कार आणि सामाजिक वादाचा मुद्दा
या संपूर्ण वादात चमत्कार, अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा संघर्ष पुन्हा समोर आला आहे. श्याम मानव यांनी जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी करत शास्त्रींच्या काही दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर शास्त्रींच्या समर्थकांचा दावा आहे की त्यांच्या कार्यामागे धार्मिक श्रद्धेचा आधार आहे. दोन्ही बाजूंमधील हे आव्हान-प्रतिआव्हान आता केवळ वैयक्तिक न राहता व्यापक सामाजिक चर्चेचा विषय बनले आहे.
