Dhirendra Shastri Nagpur Divya Darbar controversy : नागपूर: नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या रामकथेचा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमात त्यांनी ‘दिव्य दरबार’ म्हणजेच असाध्य रोगांवर चमत्काराने उपचार केल्याचा दावा केला आहे. एका लहान मुलावर शंभर दिवस व्हेंटिलेटरवर असताना उपचार केल्याचाही दावा त्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकारानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला आहे. या मुलावर डॉक्टरांनी उपचार केले असताना हा चमत्कार कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर धीरेंद्र शास्त्री यांनी कथेदरम्यान सांगितले की, बालाची भक्ती केल्याने आणि हनुमानजी यांचा आशिर्वाद मिळाल्याने मुलाचा जीव वाचला आहे.

काय असतो ‘दिव्य दरबार’?

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा ‘दिव्य दरबार’ बागेश्वर धाम (छतरपूर, मध्य प्रदेश) येथे भरतो. जिथे ते भक्तांच्या विनंत्या (समस्या) ऐकतात आणि भगवान हनुमानाच्या आशीर्वादाने त्यावर उपाय देण्याचा दावा करतात. हा दरबार अनेकदा चर्चा आणि वादांमध्ये गुंतलेला असतो, ज्यामध्ये अनेकदा चिठ्ठ्यांद्वारे वैयक्तिक माहिती देणे आणि भविष्यातील भाकिते करणे यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो. त्यांची राम कथा नागपूरमध्ये सुरू आहे. या कथेमध्येही त्यांचा दरबार भरत असतो. यावेळी भक्तांकडून अर्ज घेऊन त्यावर माहिती दिली जाते. यावेळी अनेक आजारांवर उपचार केल्याचा दावा केला जातो.

नागपूरमधील प्रकरण काय?

धीरेंद्र शास्त्री यांच्या रामकथेच्या पहिल्या दिवशी काही लोकांना व्यासपीठावर बोलावण्यात आले. ज्यांना दरबारामध्ये फायदा झाला अशा लोकांना मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यता आली. यावेळी एका पालकांनी सांगितले की, त्यांचा मुलगा बारा वर्षांचा आहे. त्याला कोट्यवधी लोकांमध्ये एखाद्याला होईल असा आजार झाला होता. शंभर दिवस तो व्हेंटीलेटरवर होता. या उपचारादरम्यान त्याला अनेकदा त्रास झाला. एक दिवस ५ मिनीटासाठी ऑक्सीजनही बंद झाले होते. डॉक्टरांनी सांगितले की, आता काहीच होऊ शकत नाही. जेव्हा डॉक्टरही हार मनतात तेव्हा सर्वांना देव आठवतो. सात महिने पाय उचलण्याची शक्ती ज्या मुलामध्ये नव्हती तो नरेंद्र शास्त्री यांच्या आशिर्वादाने आता पायावर उभा झाला आहे.

अनिसचा आक्षेप काय?

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रा. श्याम मानव यांनी यावर आक्षेप घेतला आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्या दाव्यानंतर यावर आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ज्या व्यक्तीने सांगितले की हा माझा मुलगा शंभर दिवस व्हेंटीलेटरवर होता. आणि पाच मिनीटे प्राणवायू बंद होऊनही तो जिवंत राहिला आहे. तर या सर्व गोष्टींचा वैद्यकीय दृष्टीने तपासणी आवश्यक आहे.