धुळे : येथील महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत ऑल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचे अस्तित्व आणखी ठळकपणे समोर आले आहे. अल्पसंख्याक मतांचे प्रभावी संघटन आणि भक्कम स्थानिक संघटनरचनेच्या बळावर एमआयएमने १० जागांवर विजय मिळवत भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनण्याचा मान पटकावला आहे.

७४ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत एमआयएमने राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शप), शिवसेना (उबाठा), महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यासह इतर पक्षांना मागे टाकत आपली राजकीय ताकद अधोरेखित केली. या निवडणुकीत एमआयएमने एकूण २१ प्रभागांमध्ये उमेदवार उभे केले होते. त्यापैकी १० उमेदवारांनी थेट लढतीत विजय मिळवला. काही प्रभागांमध्ये एमआयएम उमेदवारांनी प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांना पराभूत करत मतदारांचा विश्वास संपादन केल्याचे स्पष्ट झाले.

सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत धुळे शहरातून एमआयएमचा आमदार निवडून आल्यानंतर पक्षाने शहरात सातत्याने संघटन मजबूत करण्यावर भर दिला. स्थानिक प्रश्न, जनसंपर्क, कार्यकर्त्यांचे जाळे आणि मतदारांशी थेट संवाद या माध्यमातून पक्षाने आपली स्वतंत्र व ठोस वोट बँक निर्माण केल्याचे यंदाच्या महापालिका निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होते. या निकालानंतर एमआयएम हा केवळ उपस्थितीपुरता किंवा मर्यादित प्रभाव असलेला पक्ष न राहता, धुळे शहराच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावू शकणारा घटक म्हणून पुढे आला आहे.

महापालिकेतील विविध निर्णय प्रक्रियांमध्ये एमआयएमची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. राजकीय ताकद वाढल्याने एमआयएमसमोर आता अधिक व्यापक स्तरावर काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. शहरातील विकासकामे, मूलभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच सर्व घटकांना सामावून घेणाऱ्या लोकाभिमुख योजना राबवून “सर्वसमावेशक पक्ष” अशी ओळख निर्माण करण्याचीही हीच संधी असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

एकूणच, या निवडणुकीतून एमआयएमचे धुळे शहरातील अस्तित्व अधिक उजळले असून, आगामी काळातील स्थानिक राजकारणात पक्षाची भूमिका आणि प्रभाव अधिक वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.