नागपूर : राजकारणाचा अर्थ केवळ सत्ताकारण झाला आहे. राजकारणात राहून फार काम करणे कठीण गोष्ट आहे, अशी खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते शंकरप्रसाद अग्निहोत्री यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळय़ात आज ते बोलत होते.
सध्या राजकारणाचा अर्थ बदलून सत्ताकारणाला अधिक महत्त्व आले आहे. परिणामी राजकीय व्यक्ती निवडणुका जिंकण्यासाठीच धडपडत असतात. राजकारणात खूप जास्त काम करता येत नाही. त्यामुळे राजकारणाचा मुख्य उद्देश नष्ट होत चालला आहे. स्वातंत्र्यानंतर एक पिढी अशी होती जी राजकारण करताना आपले तत्त्व, सिद्धांत, नीती, मूल्य, सामाजिक दायित्वासह शिक्षण क्षेत्रामध्ये, आरोग्याच्या क्षेत्रामध्ये काम करीत होती आणि राजकारणाला राष्ट्रकारण समजत होती, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.