नागपूर : भारत- पाकिस्तानदरम्यान युद्धजन्य स्थिती असतांनाच भारताच्या मध्यभागी असलेल्या नागपुरात काही पेट्रोल पंपावर डिजिटल पेमेंट बंद झाल्याचे चित्र होते. दरम्यान पेट्रोल पंप चालकांच्या संघटनेकडून १० मे पासून डिजिटल पंप बंदची घोषणा केली गेली होती. त्यानंतर संघटनेने महत्वाचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे नागपुरात नेमके काय घडले, हे आपण बघू हा.

नागपुरातील काही वाहनधारक नरेंद्र नगर, धरमपेठ, कामठी रोडच्या पेट्रोल पंपावर शुक्रवारी वाहनात इंधन भरण्यासाठी गेले. तिथे त्यांना डिजिटल पेमेंट बंद दिसले. त्यामुळे त्यांना पेट्रोल पंपावरील डिजिटल पेमेंट बंद झाल्याचे आंदोलन सुरू झाल्याचे वाटले. दरम्यान विदर्भातील पेट्रोल पंप चालकांच्या संघटनेकडून १० मे पासून या आंदोलनाची घोषणा केली गेली होती. यावेळी संघटनेने सांगितले होते की, सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल पेमेंट’कडे मोर्चा वळवल्याने केंद्रीय गृह खात्याने संशयित बँक खात्यातून ज्या बँक खात्यात रक्कम वळती झाली, ते खाते गोठवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार नॅशनल सायबर क्राईम पोर्टलद्वारे बँकांना सूचना देण्यात येत आहे. त्याचा फटका पेट्रोल पंप चालकांना बसत आहे. अनेक पेट्रोल पंप चालकांचे बँक खाते गोठवण्यात आले आहे, त्यात त्यांचे लाखो रुपये अकडले आहेत. त्यामुळे पेट्रोल पंप चालकांनी यापुढे डिजीटल पेमेंट घेण्यास नकार दिला आहे. याची झळ ग्राहकांना बसणार आहे.

बँकांनी आता एटीएममधून रोख रक्कम काढण्यावर शुल्क आकारणे सुरू केले आहे. त्यामुळे वारंवार रोख काढण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोल पंप चालकांचा डिजिटल पेमेंट व्यवहार न करण्याचा निर्णय घेतला असून फोन पे, पेटीएम, गुगल पे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यांद्वारे व्यवहार करण्यास मनाई केली जाणार आहे. हा निर्णय सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. त्यातच नागपुरात काही पंपांनी डिजिटल पेमेंट घेतले नसल्याने पेच निर्माण झाला होता. त्यावर ऑल महाराष्ट्र पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे राज्य अध्यक्ष अमित गुप्ता यांनी भाष्य केले आहे. गुप्ता म्हणाले, डिजिटल पेमेंट बंदचे आंदोलन १० मे पासून जाहीर केले होते. ते देशातील युद्धजन्य स्थिती बघून स्थगित केले गेले. शुक्रवारी काहो ग्राहकांना एचपीसीएलच्या पंपावर सर्व्हरच्या समस्येमुळे डिजिटल पेमेंटची समस्या आल्याचे नाकारता येत नाही. परंतु त्याच्याशी पंप चालकांच्या आंदोलनाचा काहीही संबंध नाही.