नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरमध्ये घडविलेल्या धम्मक्रांतीमुळे दीक्षाभूमीला देशभरातील आंबेडकरी अनुयायांसाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपुरात असल्याने या शहराची ओळख संघभूमी म्हणूनही आहे. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा, तर रेशीमबाग मैदानावर संघाचा दसरा महोत्सव आयोजित केला जातो. मात्र, यंदा दीक्षाभूमीचा वेगळ्याच कारणासाठी संघभूमीशी संबंध जोडला जात आहे. त्याला किनार आहे दीक्षाभूमीवरील स्मारक समितीच्या वादाची. ऐन दसऱ्याच्या तोंडावर या वादातून झालेल्या आरोपातून नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. दीक्षाभूमी संघाच्या ताब्यात जाण्याची भीती व्यक्त केली जात असली तरी या आरोपांना आधार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दीक्षाभूमी संघाच्या ताब्यात जाण्याची भीती व्यक्त केली होती. त्यानंतर दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई यांनीही या भीतीला दुजोरा दिल्याचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले. धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि संघाचा दसरा महोत्सव जवळ आलेला असताना झालेल्या या विधानांमुळे दीक्षाभूमीच्या व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला. या विधानांमुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये अस्वस्थता, तर संघाच्या विचारांशी सहमत असलेल्या नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

दीक्षाभूमीवरील स्मारक समितीतील मतभेद हा यामागील मूळ प्रश्न आहे. समितीतील वादाबाबत आंबेडकरी समाजातून यापूर्वीही विविध व्यासपीठांवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनीही अलीकडेच संबंधितांना हा वाद मिटविण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यादृष्टीने ठोस पावले उचलली जात असल्याचे दिसत नाही. उलट, समितीतील मतभेदांच्या चर्चेला संघाच्या कथित ताब्याच्या भीतीची जोड मिळाल्याने वादाचे स्वरूप अधिक संवेदनशील झाले आहे.

संघाच्या हस्तक्षेपाचा आधार काय?

दीक्षाभूमी संघाच्या ताब्यात जाण्याची भीती व्यक्त केली जात असली, तरी या दाव्याला पुष्टी देणारे कोणते पुरावे सार्वजनिकरीत्या मांडण्यात आले नाही . संघाला मानणाऱ्या नागरिकांच्या मते, संघ ही स्वतंत्र संघटना असून ती स्वतःच्या ध्येयधोरणांनुसार काम करते. दीक्षाभूमीच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप करण्याचा किंवा ती ताब्यात घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

संघ असे का करेल ?

केंद्रात आणि राज्यात संघाच्या विचारांशी जवळीक असलेल्या पक्षांची सत्ता असल्यामुळे असा धोका संभवतो, असा युक्तिवाद केला जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, केवळ राजकीय सत्तासमीकरणांच्या आधारे दीक्षाभूमी ताब्यात घेण्याचा प्रयत्न होईल, असा निष्कर्ष काढता येईल का? दीक्षाभूमी आंबेडकरी समाजासाठी अत्यंत महत्वपूर्ण स्थळ आहे, त्यावर कोणी ताबा घेणे ही बाब हासमाज कधीच खपवून घेणार नाही, याची कल्पना सरकारसह सर्वांना आहे, त्यामुळे कोणीही असा प्रयत्न करण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत स्मारक समितीच्या वादात संघाला विणाकारण ओढणे, न पटणारे ठरते.

आरोप केवळ भीती दाखवण्यासाठी ?

संघ दीक्षाभूमी ताब्यात घेणार अशा प्रकारचे आरोप हे केवळ स्मारक समितीवर आपले वर्चस्व कायम राहावे यासाठी केले जात आहे का ? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. स्मारक समितीतील वाद मिटवून एकजुटीने काम केल्यास समितीकडे वक्रदृष्टीने पाहण्याची कोणाची हिंमत होणार नाही,अशी स्थिती असताना समितीवर आपलेच वर्चस्व असावे या प्रयत्नातून संघाची भीती तर दाखवली जात नाही ना ? असा प्रश्न विचारला जात आहे समितीचे सचिव राजेंद्र गवई म्हणतात त्यानुसार डॅा. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे सर्व विश्वस्त एकाबाजूने आणि भदंत ससाई दुसऱ्या बाजूने,असे चित्र आहे आता समाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे. अन्यथा ससाई व त्यांचे समर्थक दीक्षाभूमी आरेसएसच्या ताब्यात देतील,अशी भीती गवई व्यक्त करतात.