नागपूर : दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरेई ससाई व सचिव डॉ. राजेंद्र गवई , विलास गजघाटे गटात वाद सुरू आहे. प्रथम गवई गटाने ससाई यांना अध्यक्ष पदावरून काढण्याचा ठराव घेतल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आता भंते ससाई यांनी गवई व गजघाटे यांचेच सदस्यत्व रद्द करन त्यांना समितीमधून बाहेर केल्याचे जाहीर केले. समितीमधील अंतर्गत वादाला राजकीय किनार असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. या वादामुळे प्रशासकाची नियुक्ती होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.तर यावर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, हा ट्रस्टचा अंतर्गत विषय असून त्यामध्ये शासनाचा कोणताही हस्तक्षेप नाही, असे ते म्हणाले.
दीक्षाभूमी विकासाचा आराखडा १५ दिवसांत सार्वजनिक
देश विदेशातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांचे शक्तीस्थळ म्हणून ओळखल्या जाणा-या दीक्षाभूमी विकासाचा आराखडा सर्वसहमतीतून साकारू, असे सूतोवाच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीबाबत जी आस्था व दूरदृष्टी ठेवली त्याचे प्रतिबिंब दीक्षाभूमी परिसरात चांगल्या पद्धतीने कसे उमटेल याची आपण काळजी घेत आहोत. लाखो अनुयायी येथून प्रेरणा घेऊन जातात. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही त्यांनी दिलेली प्रेरणा प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. पंचशील तत्वाचे पालन आणि धम्माचे तत्व हे दीक्षाभूमी परिसरात अधिकाधिक चांगल्या पद्धतीने प्रतिबिंबित झाले पाहिजे, असे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
दीक्षाभूमीच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाने स्वतंत्र आराखडा तयार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक दीक्षास्थळाचा वारसा जपत हा आराखडा तयार करण्यात आला आहे. पुढील १५ दिवसांत हा आराखडा सार्वजनिक केला जाईल. त्यापूर्वी दीक्षाभूमीशी संबंधित मान्यवरांशी चर्चा करून अंतिम आराखड्याला मंजुरी दिली जाईल. पुढील तीन वर्षांत विकासकामे पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
