देवेश गोंडाणे नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब २०२२च्या मुख्य परीक्षेचा दुसरा पेपर केवळ मुंबई येथीलच परीक्षा केंद्रात घेतला जाणार आहे. ‘एमपीएससी’च्या या निर्णयामुळे विदर्भासह मुंबईबाहेरील उमेदवारांवर अन्याय झाल्याची ओरड होत आहे. ७, १४ आणि २२ ऑक्टोबरला विविध पदांची परीक्षा होणार असल्याने उमेदवारांना या वेगवेगळय़ा तारखांना मुंबईचा प्रवास करणे, तेथे राहणे आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नसल्याने ऐन परीक्षेच्या तोंडावर जणांवर मानसिक दडपण वाढले आहे. ‘एमपीएससी’तर्फे ८ ऑक्टोबर २०२२ला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा२०२२ मधून सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक या पदासाठी परीक्षा घेण्यात आली. ११ ऑगस्ट २०२३ला या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी देण्यात आलेल्या नियोजित वेळापत्रकानुसार सर्व पदांच्या मुख्य परीक्षा या सर्व विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र, ऐनवेळेवर ठिकाण बदलून मुंबई करण्यात आले. विदर्भातून राज्य कर निरीक्षक पदासाठी २३७, सहाय्यक कक्ष अधिकारी पदासाठी २१४ तर दुय्यम निबंधक पदासाठी १३० उमेदवार मुख्य परीक्षा देणार आहेत. यापूर्वी यापेक्षा कमी विद्यार्थी असतानाही आयोगाने प्रत्येक विभागीय केंद्रांवर परीक्षा घेतली होती. आता मात्र ऐन परीक्षेच्या तोंडावर केवळ प्रशासकीय कारण सांगून परीक्षेचे केंद्र मुंबईच ठेवण्यात आले आहे. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी आयोगाच्या सचिवांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. हेही वाचा >>>अन् माजी मंत्री जिल्हाधिकाऱ्यांवर भडकले, जाणून घ्या कारण… विरोध का? उमेदवारांच्या म्हणण्यानुसार, परीक्षेच्या एका दिवसाअगोदर अनेकांना १६ तासांचा प्रवास करावा लागेल. परिणामी, अपुऱ्या झोपेमुळे परीक्षेत एकाग्र होता येणार नाही. ७, १४ आणि २२ ऑक्टोबर असे सलग तीन आठवडे पेपरकरिता ये-जा केल्यामुळे आर्थिक व मानसिक त्रास होईल. विदर्भ हा प्रदेश अविकसित असल्याने प्रशासनात येथील लोकांचा टक्का कमी आहे. ‘एमपीएससी’च्या अशा धरसोड धोरणामुळे तो टक्का आणखी कमी होण्याची भीती आहे. म्हणून या निर्णयाला विरोध होत आहे.