चंद्रपूर : प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीचा वाढीव मोबदला न मिळाल्याने संतप्त प्रकल्पग्रस्तांनी दिंदोडा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या नेतृत्वात वर्धा-वेणा नदीच्या संगमावर जलसमाधी आंदोलन केले. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसह प्रशासनाची चांगलीच धावाधाव झाली.
हिंगणघाट तालुक्यातील सावंगी गावच्या विठ्ठल मंदिराजवळ महिला व पुरुष प्रकल्पग्रस्त एकत्र आले. २०२३ मध्ये विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दिंदोडा प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीचा वाढीव मोबदला देण्यासाठी २४० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत प्रस्ताव मंजूर करण्यात आला नाही. सरकार विविधांगी कारणे सांगून वेळ मारुन नेण्याचा प्रकार करीत असल्याचा आरोप आहे.
धरणाची किंमत वाढवून घ्यायची, परंतु शेतकऱ्यांच्या जमिनीची किंमत वाढवून देण्याची इच्छाशक्ती दाखवत नाही. सरकारने २४० कोटीचे पॅकेज मंजूर करावे, यासाठी प्रकल्पग्रस्तांनी टोकाचा निर्णय घेतला. वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात आंदोलन करण्यात आले. वेणा नदीच्या पात्रात उतरून झेंडे घोषणांनी आंदोलन दुमदुमून गेले होते.
यावेळी दिंदोडा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रसाद पटारे निवेदन घेण्यासाठी आलेत. त्यांना नदीपात्रात निवेदन देण्यात आले. ठाणेदार सोनटक्के उपस्थित होते. कार्यकारी अभियंता पटारे म्हणाले की, तुम्ही दिलेले निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवितो व मुख्य अभियंता यांच्यासोबत बैठक घेऊन सरकारकडे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे विचारार्थ पाठवितो, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर सर्व ठाणेदारांना निवेदन सादर करीत आंदोलन स्थगित केले.
यावेळी दिंदोडा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष पुंडलिक तिजारे, समाजसेवक विलास भोंगाडे, अभिजित मांडेकर, मिथुन ठाकरे, जयंत लडके, समिक्षा गणवीर, देवराव सपाट, राजू भोयर, अरुण भगत, संजय देव्हाडे, मनोज कोसूरकर, विठ्ठल जुनघरे, संजय मेश्राम, किशोर वानखेडे, वामनराव चटप, मंजुषा लडके, वर्षा लुथडे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
