अकोला : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातील प्रचार मोहीम शिगेला पोहोचली आहे. सार्वत्रित निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेच्या या निवडणुकीत देखील भरमसाठ खर्च केला जात आहे. वकील, डॉक्टर, शिक्षक आदी गठ्ठा मतदारांना ‘डिनर’ देऊन आपल्याला प्रथम ‘पसंती’ मिळवण्याचे प्रयत्न उमेदवारांकडून करण्यात आले. भौगोलिकदृष्ट्या ५६ तालुक्यांचा अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ असल्याने प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्यात उमेदवारांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे.
अमरावती विभागात सध्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे रणसंग्राम सुरू आहे. गेल्या सलग १२ वर्षांपासून पदवीधरांचे प्रतिनिधित्व करणारे भाजपचे डॉ. रणजीत पाटील यांच्यासमोर काँग्रेसचे धीरज लिंगाडे यांचे आव्हान आहे. पदवीधरांच्या या निवडणुकीत वंचितनेही उमेदवार दिला. सोबतच काही दखलपात्र अपक्ष उमेदवार असल्याने निवडणुकीतील रंगत वाढली आहे.
सहा वर्षांमध्ये पदवीधरांची संख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे पदवीधर नोंदणी वाढणे अपेक्षित होते. मात्र, त्या उलट गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळेच्या निवडणुकीत मतदारसंख्येत घट झाली. पदवीधरांनी नोंदणीकडे देखील पाठ फिरवली. या निवडणुकीवरून पदवीधरांमध्ये निरुत्साहाचे वातावरण आहे. आता किती टक्के मतदान होणार, यावर देखील निवडणुकीचे चित्र अवलंबून राहील.
हेही वाचा >>> संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे निधन
प्रत्यक्ष मतदारांची भेट घेऊन प्रचार करण्यासाठी उमेदवारांना दररोज हजारो किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. उमेदवारांनी शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, अभियंता आदी गठ्ठा मतदारांवर व त्यांच्या संघटनांवर लक्ष केंद्रित केले आहे. आतापर्यंत ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा व लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारात मतदारांच्या जेवण्याच्या पंगती उठल्याचा अनुभव आला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार तसा मर्यादितच. मात्र, आता पदवीधरांच्या प्रचाराला ही व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.
डॉक्टर, वकील यासारख्या गठ्ठा मतदारांशी एकत्रित संवाद साधण्यासाठी ‘डिनर’ देण्याची शक्कल उमेदवारांनी लढवली. अकोल्यात अशा अनेक जेवणावळी झाल्या. या माध्यमातून प्रचाराला वेग दिला जात आहे. शिक्षक, प्राध्यापकांच्या भेटी घेऊन प्रचार करण्यासाठी शाळा, महाविद्यालयांना भेटी देण्यावर जोर आहे. या निवडणुकीत समाज माध्यमातून अत्याधुनिक प्रचार मोहीम राबविण्यासोबतच पारंपरिक भोंगा लावून देखील काही उमेदवारांकडून प्रचार केला गेला. प्रचार मोहीम अंतिम टप्प्यात आल्याने अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न उमेदवारांकडे सुरू आहेत.
अमरावतीचे मतदान निर्णायक?
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीत सर्वाधिक मतदार नोंदणी अमरावती जिल्ह्यात झाली आहे. अमरावती जिल्ह्यात उमेदवारी देण्याची मागणी झाली होती. मात्र, प्रमुख राजकीय पक्षांनी अमरावतीमधील उमेदवार दिला नाही. त्यामुळे अमरावतीतील मतदारांमध्ये काही प्रमाणात नाराजी आहे. अमरावती मतदान हे निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.