चंद्रपूर : दररोज आठ तास अभ्यास, आठ तास झोप, मित्रांसोबत चर्चा आणि आठवड्याला एक चित्रपट हा आयएएस होण्याचा सुकर मार्ग आहे अशी चर्चा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्याशी करण्याऱ्या सोहम सुरेश उईक या आठव्या वर्गातील विद्यार्थीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी थेट आपल्या खुर्चीत बसवले तर पोलीस अधीक्षक परदेशी यांनी कार्यालयात बोलवून त्याचा सत्कार केला.
चंद्रपूर हा ओघोगिक आदिवासी जिल्हा आहे. मात्र या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत गुणवत्तेची कमी नाही, अनेक हुशार विद्यार्थी आज अधिकारी, डॉक्टर, अभियंता तसेच इतर मोठ्या पदापर्यंत पोहचले आहेत. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डोंगरहळदी पंचायत समिती पोंभुर्णा या शाळेतील सोहम सुरेश उईके या विद्यार्थ्याने मागील आठवड्यात सकाळच्या सुमारास सायकलिंग करताना पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्याशी भेट झाली होती. यावेळी सोहम उईके याने पोलीस अधीक्षक यांना भविष्यात आयएएस होण्याचे स्वप्न बोलून दाखविले. नियमित आठ तास अभ्यास, आठ तास झोप, एक तास मित्रांसोबत गप्पा आणि आठवड्याला एक चित्रपट या मार्गाने गेल्यास प्रत्येकाचे आयएएस होण्याचे स्वप्न साकार होईल असे सांगितले.
हेही वाचा >>> अन् माजी मंत्री जिल्हाधिकाऱ्यांवर भडकले, जाणून घ्या कारण…
आठव्या वर्गातील मुलाच्या बोलण्यातील आत्मविश्वास आणि इतक्या लहान वयात ग्रामीण आदिवासी भागातील आदिवासी समाजातील एक मुलगा आयएएस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे हे बघून पोलीस अधीक्षक अक्षरशः भारावले. त्यांनी सोहम ला पाहिजे ती मदत करण्याचे आश्वासन दिले. पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांचे मन जिंकनाऱ्या सोहमला या दोन्ही अधिकाऱ्यांनी कार्यालयात बोलवून मनमोकळ्या गप्पा केल्या. त्याच्याशी पोलिस अधीक्षक यांच्याशी रस्त्यावर सहज चर्चा केली असता त्याने जीवनात काय करणार, किती अभ्यास करतो, त्याचे दैनंदिन वेळापत्रक काय या बाबीवर दिलखुलास उत्तरे दिली.
त्याच्या बौद्धिक चातुर्यावर खुश होऊन त्याला आपल्या कार्यालयात बोलावून आपल्या खुर्चीवर बसण्याचा मान मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिला. पोलीस अधीक्षक परदेशी यांनी त्याच्या आईवडिलांशी चर्चा केली, सोहम याचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. त्याला ध्येय प्राप्तीसाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले.