अनिल कांबळे, लोकसत्ता

नागपूर : कोंढाळीतील एका अनाथाश्रमाचा संचालक सलामुल्ला खान हाच नवजात बाळ विक्री करणाऱ्या टोळीचा म्होरक्या असून त्याने आतापर्यंत शेकडो नवजात बाळ विक्री केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याला न्यायालयाने आणखी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. टोळीतील दोन्ही परिचारिकांसह आणि बाळ विकत घेणाऱ्या महिलेची न्यायालयाने कारागृहात रवानगी केली. नवजात बाळ विक्री करणाऱ्या टोळय़ा सक्रिय झाल्याची वृत्तमालिका ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केली होती, हे विशेष.

सलामुल्ला खान गिट्टीखदानमध्ये राहत असून तो विधवा पुनर्वसन केंद्र चालवत होता. त्याचे कोंढाळीला अनाथाश्रम आहे. अनैतिक संबंधातून किंवा विधवा महिलेला झालेल्या नवजात बाळाची अनाथाश्रमाच्या माध्यमातून धनाढय़ दाम्पत्यांना लाखोंमध्ये विक्री करण्याचा सलामुल्लाचा मुख्य व्यवसाय आहे. त्यासाठी त्याने काही परिचारिकांना हाताशी घेतले. यासाठी तो परिचारिकांनाही वाटा देत होता. सरिता सोमकुंवर या शिक्षिका असून गिट्टीखदानमध्ये राहतात. त्यांच्या लहान मुलाने काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यांचा मोठा मुलगा आणि पती दोघेही दारूडे आहेत. त्यामुळे तिने एक बाळ विकत घ्यायचे ठरवले. सलामुल्ला खान याने २०१९ मध्ये सोमकुंवर यांना हेरले. त्याने धंतोलीतील एका नामांकित रुग्णालयात कार्यरत परिचारिका श्वेता सावळे ऊर्फ आयशा खान आणि रंजना भगत या दोघींना सरिता यांच्याकडे पाठवले. पाच लाखांत बाळाचा सौदा झाला. तिघांनीही पैसे घेऊन १० दिवसांचे बाळ सरिता यांना सोपवले. हे प्रकरण सरिताच्या मुलामुळे उघडकीस आले असून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने आतापर्यंत तीन टोळय़ा उघडकीस आणल्या आहेत.

खरी आई कोण?

सरिता सोमकुंवर ही बाळाची खरी आई नाही. परंतु, तिने बनावट कागदपत्रे तयार करून बाळाला जन्म दिल्याचे भासवले. या फसवणुकीत रुग्णालय, महापालिकेचे कर्मचारी आणि अन्य कुणाचा हात आहे, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. खरेदी केलेल्या नवजात बाळाची खरी आई कोण, असा प्रश्न पोलिसांना पडला असून आरोपींकडून त्याबाबत माहिती घेतली जात आहे.

शेकडो बाळांची विक्री अनाथालयाच्या माध्यमातून सलामुल्ला खान नवजात बाळांची विक्री करीत होता. धंतोलीतील त्या रुग्णालयातून आणि कोंढाळीतील अनाथालयातून आतापर्यंत शेकडो बाळांची विक्री करण्यात आली आहे. नवजात बाळ अनाथालयात आल्यानंतर लगेच धनाढय़ दाम्पत्य हेरून रुग्णालयात पाठवून प्रसूती आणि बाळाच्या जन्माचे कागदपत्रे बनवण्यात येत होते, अशी माहिती आहे.