अकोला : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघातील कामांना स्थगिती देण्याचे गलिच्छ राजकारण उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सुरू आहे, असा आरोप बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी केला. ६९ गावे पाणी पुरवठा योजनेला स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ विधिमंडळाच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मंगळवारी उपोषण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
६९ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला शिंदे-फडणवीस सरकारकडून स्थगिती देण्यात आली. योजनेला वान प्रकल्पातून पाणी पुरवठा होणार असून, याला काही ग्रामस्थांनी विरोध केला. ६० गावे पाणी पुरवठा योजनचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही सरकारने स्थगिती दिली. योजनेची किंमत २१९ कोटी रुपये असून, प्रत्यक्ष योजनेवर १९२ कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्यापैकी १०८ कोटी रुपये खर्च झाले असून, कंत्राटदाराला ९२ कोटीचे देयकही अदा करण्यात आले आहे. योजनेचे ६० टक्के काम पूर्ण झाले असतांनाही त्याला स्थगिती देण्यात आल्याचा दावा देशमुख यांनी केला.
हेही वाचा >>> अकोला : ‘भाजपचे लोकप्रतिनिधी शोधा अन् ५१ रुपये जिंका’, वंचित युवा आघाडीचे अनोखे आंदोलन
वानमधून शेगाव, जळगाव जामोद येथेही पाणी पुरवठा होतो. मात्र, त्या ठिकाणी भाजपचे आमदार असून, बाळापूर येथे मात्र शिवसेनेचा आमदार असल्यानेच भाजप विरोध करीत आहे. तत्कालीन ठाकरे सरकारने मंजूर केलेल्या पाणी पुरवठा योजनेलाच स्थगिती देत ग्रामस्थांना तहानलेले ठेवण्यात येत आहे, असा आरोप नितीन देशमुख यांनी केला. या विरोधात मंगळवारी विधिमंडळ परिसरात आंदोलन करणार आहे. अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाच हजार ग्रामस्थ देखील आंदोलन करतील, असाही त्यांनी सांगितले.