नागपूर : महापालिकेच्या ३८ प्रभागातील १५१ सदस्यांच्या निवडीसाठी आज गुरुवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. काही मतदान केंद्रावर इव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने उशिरा मतदान सुरु झाले. आज एक दिवस मतदार ‘राजा’ ठरत आहे. दिव्यांग मतदारांना ऍम्ब्युलन्सने मतदान केंद्रावर आणले जात आहे. लकडगंज झोमध्ये एका ज्येष्ठ दिव्यांग नागरिकाला ऍम्ब्युलन्सने आणण्यात आले. मतदानानंतर घरी सोडून देण्यात आले. दरम्यान, संघांचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सकाळी मतदान केले. मतदान केंद्रांवर एकूण ३ हजार पेक्षा जास्त कंट्रोल युनिट आणि जवळपास १० हजार बॅलेट युनिटचे लावण्यात आले आहे.

काल बुधवारी उशिरा रात्रीपर्यंत मतदान केंद्रावर साहित्याची जुळवाजुळव करण्यात आली. मतदान केंद्रांवर रॅम्प, पिण्याचे पाणी, व्हिलचेअर, प्रथमोपचार किट आदींची सुविधा करण्यात आली आहे.

मतदान केंद्र असे शोधता येईल

महापालिकेचे संकेतस्थळ http://www.nmcnagpur.gov.in यावर ‘आपले मतदान केंद्र’ ही विंडो आहे. यावर क्लिक केल्यानंतर नावानुसार किंवा मतदार ओळखपत्राच्या ईपीक क्रमांक नोंदवावा, त्याखाली मतदारांनी प्रभाग क्रमांक नमूद करायचा, यानंतर मतदाराला मतदान केंद्र दिसून येईल, याचवेळी डिटेल असा पर्याय उपलब्ध राहील, यावर क्लिक केल्यानंतर मतदान केंद्राचा नकाशा दिसून येईल. मनपाचे चॅटबॉट, एआय मित्र व माय नागपूर ॲपवर मतदान केंद्र तात्काळ शोधता येणार आहे. यासंदर्भात या डिजीटल प्लॉटफॉर्मवर महापालिकेने आपले मतदान केंद्र ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यात मतदारांना मतदार ओळखपत्रावर असलेले नाव किंवा मतदार ओळखपत्र क्रमांक (ईपीआयसी) नुसार शोधता येणार आहे. मतदाराला मराठी किंवा इंग्रजी भाषेचा नाव शोधण्यासाठी उपयोग करता येणार आहे. मतदारांनी ईपीक क्रमांकानुसार मतदान केंद्र शोधल्यास अधिक अचूक व तात्काळ माहिती मिळू शकेल.

अपंग मतदारांकारिता विशेष सोय

उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये अपंग मतदारांसाठी महापालिकेतर्फे विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अपंग मतदारांकारिता ९१७५४१४३५५ हा व्हॉट्सॲप क्रमांक निश्चित केला आहे. यावर लोकेशन शेअर केल्यानंतर मतदान बूथवर ये-जा करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत त्यांच्या निवास स्थानावरून मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी प्रत्येक झोनमध्ये झोनल वैद्यकीय अधिकारी यांच्या पर्यवेक्षणाखाली एका वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

शहर बससेवेच्या वेळापत्रकात बदल

नागरिकांच्या सोयीसाठी आणि वाहतुकीचे सुरळीत नियोजन करण्यासाठी शहर बस सेवेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आज सकाळी ६:०० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत सर्व मुख्य मार्गांवर आणि इनर रिंग रोडवर विशेष २५० बसेस धावतील. या कालावधीत विविध ठिकाणांहून येणाऱ्या बसेस फक्त शहराच्या ‘ऑक्ट्रॉय’ (नाका) हद्दीपर्यंत चालवल्या जातील. तर दुपारी १:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत बससेवा मर्यादित स्वरूपात राहणार आहे. शहरातील प्रमुख मार्गांवर केवळ ५० बसेस कार्यान्वित राहणार आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व बसेसवर सुधारित मार्ग आणि गंतव्यस्थानांचे फलक स्पष्टपणे लावण्यात आले आहे.

शुक्रवारी १ वाजेपर्यंत निकाल

निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर १० मतमोजणी केंद्राची स्थापना करण्यात आली असून शुक्रवारी (१६ जानेवारी) सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. साधारणतः प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे २० टेबल मतदान यंत्रासाठी तसेच पोस्टल बेलेट साठी ४ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक व एक सहायक नियुक्त करण्यात आले आहे. शुक्रवारी साधारणपणे १ वाजेपर्यंत निकाल मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रभाग : ३८ (३६ प्रभाग ४ सदस्य, एक प्रभागात ३ सदस्य)

  • सदस्य : १५१
  • एकूण मतदार : २४,८३,११२
  • पुरुष : १२,२६,६९०
  • महिला : १२,५६,१६६
  • इतर : २५६
  • एकूण उमेदवारांची संख्या : ९९३
  • भाजप : १४३
  • शिंदे शिवसेना : ८
  • काँग्रेस : १५१
  • राष्ट्रवादी (अजित पवार) : ८७
  • राष्ट्रवादी (शरद पवार) : ७९
  • बसप : ८२
  • आप : ६५
  • शिवसेना ठाकरे : २४