scorecardresearch

आंबोली परिसरात कोळय़ाच्या नव्या प्रजातीचा शोध

जगात ‘कॉनोथीले’ या पोटजातीत जवळपास ३४ प्रजातींची नोंद असून त्यातील सहा प्रजाती भारतात आढळून येतात.

नागपूरमधील तरुण संशोधकांना यश; ‘कॉनोथीले ओगलेई’ असे नामकरण

नागपूर : पाल, मासे, सरडे यांच्या नवनव्या प्रजाती शोधून काढणाऱ्या राज्यातील तरुण संशोधकांनी ‘ट्रॅपडोर कोळी’ प्रजातीच्या ‘कॉनोथीले’ पोटजातीतील नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. २०१६ मध्ये अक्षय खांडेकर व स्वप्निल पवार यांनी हा शोध लावला होता. सुमारे सहा वर्षांनंतर २९ मार्चला त्यांचे हे संशोधन ‘ऑथ्रेपोडा सिलेक्ट’ या स्वशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाले आहे. या नव्या प्रजातीचे ‘कॉनोथीले ओगलेई’ असे नामकरण करण्यात आले आहे. भारतातून शोधण्यात आलेली ही सहावी प्रजाती आहे. वन्यजीव अभ्यासक हेमंत ओगले यांच्या आंबोलीच्या संवर्धन कार्यातील योगदानाचा गौरव करत या प्रजातीला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

जगात ‘कॉनोथीले’ या पोटजातीत जवळपास ३४ प्रजातींची नोंद असून त्यातील सहा प्रजाती भारतात आढळून येतात. २०१६ मध्ये अक्षय खांडेकर आणि स्वप्निल पवार यांना महाराष्ट्राच्या उत्तर-पश्चिम घाटातील आंबोलीमधील हॉटेल विसिलग वूडच्या परिसरात सर्वप्रथम ‘कॉनोथीले ओगलेई’ ही प्रजाती आढळून आली. जीवशास्त्रज्ञ राजेश सानप यांनी  परीक्षण केल्यानंतर ही प्रजाती नवीन असण्यावर शिक्कामोर्तब केले. सानप यांच्याबरोबर अक्षय खांडेकर, स्वप्निल पवार आणि अनुराधा जोगळेकर यांनीही या संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावली. हा अभ्यास २९ मार्च २०२२ ला ‘आर्थोपोडा सिलेक्ट’ या स्वशोधन पत्रिकेत प्रकाशित झाला. 

‘ट्रॅपडोर कोळी’ एका विशिष्ट प्रकारच्या घर बनवण्याच्या गुणधर्मामुळे ओळखले जातात. हे जमिनीत बिळ बनवतात आणि ते विशिष्ट पद्धतीने बंद केले जाते. बिळाच्या प्रवेशद्वारावर दगड, माती, पालापाचोळा आदी पसरवून ते लपवले जाते.  कोळी दाराबाहेर चिकट जाळे पसरवून ठेवतो. जेव्हा एखादे भक्ष्य जाळय़ावर जाते, तेव्हा बिळाच्या आत दबा धरून बसलेल्या कोळय़ाला जाळय़ाचे कंपन जाणवते आणि तो बिळाच्या प्रवेशद्वारातून बाहेर येऊन भक्ष्यावर झडप घालतो. या अनपेक्षित हल्ल्यातून भक्ष्य सहजपणे सुटू शकत नाही.

नामकरणाचे कारण..

ओगले यांचे नाव देताना आनंद आंबोलीच्या सभोवतालच्या वनस्पती आणि प्राण्यांचे दोन दशकांहून अधिक काळ अथकपणे दस्तऐवजीकरण करणारे प्रख्यात निसर्गशास्त्रज्ञ आणि फुलपाखरू जीवशास्त्रज्ञ हेमंत ओगले यांचे नाव या अनोख्या कोळय़ाला देताना आम्हाला खूप अभिमान वाटतो. वर्गीकरणशास्त्रज्ञ असल्याने, माझ्या संशोधन कारकिर्दीत ज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले, अशा लोकांची नावे नव्या प्रजातीला देण्याचे स्वप्न होते, असे संशोधक अक्षय खांडेकर म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Discovery of new species of spider in amboli area zws

ताज्या बातम्या