अमरावती : वऱ्हाडी भाषेतील ‘आलू वांग्याची भाजी, अन् गपगप शिरा..’ हे गाणे समाज माध्यमांवर गाजले आणि त्या लग्नातील चंपतराव आणि मंजुळाबाई ही जोडी प्रेक्षकांना भावली. या अल्बममध्ये अभिनय करणारे अनिकेत देशमुख आणि श्रुतिका गावंडे हे दोघे नुकतेच लग्नबंधनात अडकले. अमरावतीतील तेलई मंगल कार्यालयात दोघांचा विवाहसोहळा पार पडला. अनिकेत आणि श्रुतिका यांच्या लग्नाची छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारीत झाली आहेत. दोघांच्याही चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
वऱ्हाडी भाषेतील संवादाद्वारे अनेक शॉर्ट फिल्म्स, रिल्सद्वारे अमरावतीची श्रुती आणि अनिकेत हे दोघे सलग तीन वर्षांपासून समाज माध्यमांवर धमाल करीत आहेत. त्यांची ही धमाल आज संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाली आहे. नवरा बायकोच्या भांडणावरील त्यांच्या अभिनयाने त्यांच्या चाहत्यांना अक्षरशः वेड लावले आहे.
नाटक आणि अभिनयाची आवड असलेल्या अनिकेत देशमुखने वाणिज्य शाखेची पदवी मिळाल्यावर मुंबईत एमबीए केले. काही वर्ष मुंबईत नोकरी केल्यावर तो पुण्यातील एका कंपनीत नोकरीवर लागला. नंतर करोना काळातील टाळेबंदीमुळे वर्षभर ‘वर्क फ्रॉम होम’ या नव्या संकल्पनेत अनिकेत अमरावतीत आपल्या घरी आला. यानंतर समाज माध्यमाने अभिनयासाठी त्याला नवे दालन उपलब्ध करून दिले.
खास वऱ्हाडी भाषेत वायएफपी या चॅनलद्वारे त्याने एक दोन मिनिटाच्या विनोदी चित्रफिती तया केल्या. समाज माध्यमांवरील या चित्रफितींना भरपूर प्रतिसाद मिळाला. त्यांच्या चमूला आणखी काही हास्य विनोदी चित्रफितींसाठी नायिका हवी होती. नायिकेचा शोध सुरू झाला. त्यांची पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या श्रुतिका गावंडे या तरुणीशी भेट झाली. यानंतर अनिकेत आणि श्रुतीच्या जोडीने समाज माध्यमांवर अक्षरशः धमाल केली.
अस्सल वऱ्हाडी भाषेत संवादाची फेक करीत एखाद्या तरबेज कलावंताप्रमाणे श्रुतीचा अभिनय प्रेक्षकांना आवडला. अनेक शॉर्ट फिल्म, रिल्सद्वारे श्रुतीने प्रत्येकाच्या मोबाईलवर ताबा मिळवला. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत श्रुतीच्या अभिनयाची प्रशंसा व्हायला लागली. विदर्भाची श्रुती म्हणून तिच्या इंस्टाग्रामवरील पेजला दोन लाखाच्या वर प्रेक्षकसंख्या लाभली आहे. श्रुतीच्या व्लॉग्सला देखील भरपूर पसंती मिळत आहे.
त्यांचे ‘सातबारा’ या नव्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करण्यासाठी दोघांची धडपड सुरू आहे. विविध सामाजिक विषयांवर हास्य विनोदी चित्रफिती तयार करण्यासाठी टाळेबंदीच्या काळात एकत्र आलेले अनिकेत आणि श्रुती यांच्यात छान मैत्री निर्माण झाली. अनिकेतने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तिने होकार दिल्यावर तिच्या घरच्यांनीही लग्नाला मान्यता दिली. छोट्या पडद्यावरील ही जोडी आता लग्नबेडीत अडकली आहे.