नागपूर : काँग्रेसचे १५ आमदार सोमवारी दिल्लीत दाखल झाले आहेत. आज मंगळवारी ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याचे यातीलच एका आमदाराने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
या सर्व आमदारांनी सोमवारी राष्ट्रीय सरचिटणीस वेणूगोपाल यांची भेट घेतली. महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असतानाही कामे होत नसल्याची या आमदारांची तक्रार आहे.
या नाराज आमदारांमध्ये पश्चिम नागपूरचे विकास ठाकरे यांचा समावेश आहे. त्यांच्यासह १५ आमदार दिल्लीत पोहचले. यापूर्वी नाराज आमदारांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून भेटण्याची वेळ मागितली होती. यातील काही आमदारांनी याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात उघड नाराजी व्यक्त करीत काँग्रेसचे मंत्री आणि पालकमंत्र्यांविरोधातही नापसंती जाहीर केली होती. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र आमदारांनी आपल्या पक्षश्रेष्ठींना भेटण्यात काही वावगे नाही. आमदाराचे प्रशिक्षण दिल्लीत आहे. त्यानिमित्ताने आमदार दिल्लीत पोहचले आहेत, असे सांगितले. दरम्यान, सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रातून काँग्रेस आमदार महाविकास आघाडीवर नाराज असल्याचे स्पष्ट होते. काँग्रेसच्या वाटय़ाचे विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. तसेच विविध महामंडळे, शासकीय समित्यांवरील नियुक्त्या रखडल्या आहेत.
काही आमदारांची काँग्रेसच्या मंत्र्यांविरुद्ध तक्रार आहे. हे मंत्री स्वपक्षीय आमदार आणि पदाधिकाऱ्यांची कामे करीत नसल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर या नाराज आमदारांची सोनिया गांधींशी होणारी भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.