• चोरी, अपघातग्रस्त, बेवारस आणि जप्त केलेली वाहने पडून
  • नियमित लिलाव होत नसल्याने संख्या वाढली

नागपूर : पोलीस आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस ठाणे ‘स्मार्ट ठाणे’ म्हणून विकसित केले जात आहे. मात्र, याच पोलीस ठाण्याच्या आवारात जुनी-भंगार वाहने ठेवण्यात आल्याने पोलीस ठाण्याच्या स्मार्ट संकल्पनेलाच धक्का बसला आहे. पोलिसांकडून चोरीची वाहने, अपघातात जप्त केलेली वाहने, बेवारस सापडलेली वाहने तसेच गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. यासाठी पोलिसांकडे मुख्यालयात ‘डिम्पग यार्ड’ आहे. परंतु, गेल्या अनेक महिन्यांपासून वाहनांचा लिलाव न झाल्याने तेथेही आता भंगार वाहने ठेवण्यास जागा शिल्लक नाही. पोलीस ठाण्याच्या आवारात चोरीची किंवा तत्सम प्रकरणातून जप्त वाहने ठेवण्यात आली आहेत. यातील अनेक भंगार झाली आहेत. यात दुचाकींची संख्या अधिक आहे. चोरटे नागपूरच्या आजूबाजूला असलेल्या जिल्ह्यातून ही वाहने शहरात आणतात. त्या वाहनांच्या नंबर प्लेट काढून ती बिनधास्त चालवली जातात. पोलिसांच्या गस्तीत ती सापडली तर चोरटे ही वाहने सोडून पळून जातात. त्यानंतर ही वाहने जप्त करून नजिकच्या पोलीस ठाण्यात ठेवली जाते. नंबर प्लेट नसल्यामुळे ही वाहने वर्षोनुवर्षे तेथेच पडून राहतात. मूळ मालक न सापडल्याने पोलिसांचाही नाईलाज असतो. त्यामुळे पोलीस ठाण्यांमध्ये अशा वाहनांची संख्या वाढली आहे. शहरातील काही पोलीस ठाणे नव्या भव्यदिव्य इमारतीत सुरू झाले असले तरी या इमारतीलादेखील जुन्या वाहनांचा विळखा पडला आहे.

चोरीच्या वाहनांची स्वस्तात विक्री

मध्यप्रदेश, झारखंड, उत्तरप्रदेश आणि आंध्रप्रदेशातील चोरीची वाहने महाराष्ट्रात आणून स्थानिक दलालांच्या मदतीने कमी किंमतीत विकली जातात. या वाहनांची कागदपत्रे नसतात. पोलिसांच्या हाती लागल्यानंतर ही वाहने जप्त केली जातात. त्यावर कुणीही हक्क दाखवत नसल्याने ही वाहने पोलीस ठाण्यात पडून असतात.

कागदपत्रांअभावी वाहने पडून

वाहतूक पोलिसांनी गाडी पकडल्यावर चालकाला परवाना आणि गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली जाते. ती न दाखवल्यास गाडी जप्त केली जाते. मूळ कागदपत्रे दाखवल्यावर दंड भरून गाडी सोडली जाते. परंतु, अनेकदा कागदपत्र नसल्याने वाहने सोडवली जात नाही ती पोलीस ठाण्यात पडून राहतात.

रस्त्याच्या कडेलाही नादुरुस्त वाहने 

शहरातील अनेक रस्त्याच्या कडेला जुनाट आणि बंद पडलेली वाहने उभी केलेली असतात. त्याचा वाहतुकीस अडथळा होतो. ही वाहने जप्त करून त्याचा लिलाव केल्यास किंवा मूळ मालकांना नोटीस देऊन रस्ता मोकळा केल्यास वाहतूक कोंडी टळू शकते.

पोलिसांचे आवाहन

जप्त आणि जमा असलेली वाहने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून सोडवून घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून वेळोवेळी केले जाते. परंतु त्याला प्रतिसाद का मिळत नाही हा संशोधनाचा विषय आहे. पोलिसांकडून ही वाहने खरेदी करण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया पार पाडावी लागत असल्याने अपघातातील जप्त अनेक वाहनांचा नाद मालकांनी सोडून दिल्याचे सांगितले जाते. यामुळे पोलीस ठाणे आवारातील वाहनांची संख्या वाढत जाते.

पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांचा ताबा घेण्याबाबत मालकांना नोटीस बजावली जाते. जुन्या आणि जप्त वाहनांची लिलाव प्रक्रिया शासनाच्या आदेशाने राबवली जाते.

– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, नागपूर</p>