उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि शिंदे गटात गेल्या काही दिवसांत दसरा मेळाव्यावरून वाद रंगला होता. न्यायालयाने या वादाचा निपटारा केला आणि उद्या, विजयादशमीला दोन्ही गटांचा दसरा मेळावा वेगवेगळ्या मैदानावर होत आहे. मुंबईतील या दसरा मेळाव्याची देशभरात चर्चा सुरू असतानाच भंडारातील दसरा उत्सवावरून एकाच पक्षाच्या दोन गटात उद्भवलेला वादही न्यायालयात पोहोचला आहे.

हेही वाचा- गडचिरोली : सूरजागड लोहखाणीतील ट्रक चालकाचा आदिवासी महिलेवर बलात्कार; आरोपीस अटक

खात मार्गावरील रेल्वे प्रशासनाच्या जमिनीवर रावण दहनाला रेल्वेने परवानगी नाकारल्यानंतर एकाच पक्षाच्या दोन गटात सुरू असलेल्या वादावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी झालेल्या सुनावणीत रेल्वेला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची सूचना केली.

भंडारा नगर विजयादशमी उत्सव समितीचे दोन गट असून त्यांना विजयादशमीचा उत्सव एकाच ठिकाणी साजरा करायचा आहे. या दोन्ही गटांना सुमारे २२,५०० चौरस मीटरच्या विस्तीर्ण जमिनीवर त्यांच्या वाटप केलेल्या क्षेत्रात त्यांचे कार्य करण्याची परवानगी होती. नंतर गैरसोयीमुळे रेल्वेच्या विभागीय अभियंता यांनी परवानगी रद्द केली. परवानगी देण्यापूर्वी विचार व्हायला हवा होता, असे असताना अचानक गैरसोयीचे कारण कसे समोर आले, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आहे. आता परिस्थिती अशी आहे की, भंडारा तहसीलदारांनी याचिका प्रलंबित राहिल्याचे कारण देत याचिकाकर्त्यांच्या गटाला समारंभ आयोजित करण्यासाठी दिलेली ना-हरकत रद्द केली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेऊन रेल्वेच्या विभागीय अभियंत्यांनी विजयादशमीच्या आयोजनाला परवानगी देण्याच्या मुद्यावर पुनर्विचार करावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहे.

हेही वाचा- तब्बल ९ महिन्यानंतर गुरुवारी डीपीसीच्या बैठकीचे आयोजन; उपमुख्यमंत्री व पालकमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

दरम्यान, कोणत्याही गटाला परवानगी दिल्याने कायदा आणि सुव्यवस्थेत काही बिघाड झाल्यास त्याची जबाबदारी रेल्वेची असेल, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. उच्च न्यायालयाने याप्रकरणी दिलेल्या निर्देशानुसार रेल्वे प्रशासन काय निर्णय घेते, याकडे याचिकाकर्त्यांसह शहरवासियांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मुंबईतील दसरा मेळाव्याची चर्चा पंचक्रोशीत सुरू असताना स्थानिक दसरा उत्सव आयोजनावरूनही जिल्ह्यात तर्कवितर्क लावले जात आहे.