वाशीम : जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिर हे जैनांची काशी म्हणून जगप्रसिद्ध संस्थान आहे. परंतु १९८१पासून दिगंबर व श्वेतांबर समुदायांमध्ये मंदिराच्या मालकीवरून वाद असल्याने मंदिर कुलूपबंद होते. मात्र, या मंदिराचे कुलूप उघडून मंदिरातील पार्श्वनाथांच्या मूर्तीला लेप करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने २२ फेब्रुवारी रोजी दिल्यानंतर, अखेर ११ मार्च रोजी तब्बल ४२ वर्षांनी या मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आहे. या निर्णयाचे दोन्ही गटाकडून स्वागत केले जात आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चनसिंह यांच्या हस्ते साकरचंद शाह यांच्याकडे मंदिराच्या चाव्या सुपूर्द केल्यानंतर पोलीस व मंदिराच्या विश्वस्तांनी मंदिराचे दरवाजे उघडले. ४२ वर्षांनी मंदिर उघडण्यात आल्याने आता मूर्तीची लेप प्रकिया पूर्ण केली जाणार असून, भाविकांना पूजा करता येणार आहे. त्यामुळे समाजबांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
हेही वाचा >>> आश्चर्य! नामांतर होऊनही समृद्धी महामार्गावर मात्र ‘औरंगाबाद’ नाव कायम
यामुळे संस्थान होते कुलूपबंद
शिरपूर जैन येथे हे जगप्रसिद्ध अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिर आहे. या मंदिरावरून दिगंबर जैन व श्वेतांबर जैन पंथांमध्ये वाद होता. परिणामी २२ एप्रिल १९८१ रोजी या मंदिराला कुलूप लागले होते. भाविकांना एका छोट्या झरोक्यातून दर्शन घ्यावे लागत होते. न्यायालयीन लढाई सुरू होती. प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचले होते. अखेर २२ फेब्रुवारी २०२३ रोजी मंदिराचे दरवाजे उघडण्याचे व मूर्तीला लेप करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.