*  वेळापत्रक राखण्यासाठी झोन अधिकाऱ्यांमध्ये वाद * नागपूर स्थानकावरील प्रकार

दुचाकी, चारचाकी वाहनांच्या पार्किंगवरून भांडणे होत असल्याचे आपण बघितले आहे, पण रेल्वेगाडीच्या पार्किंगवरून वाद उद्भवत असल्याचा नवीनच प्रकार नागपूरच्या मध्यवर्ती रेल्वेस्थानकावर समोर आला आहे. आपापल्या झोनची उत्पादकता आणि वक्तशीरपणा राखण्यासाठी इतर झोनच्या गाडय़ांना रेल्वेस्थानकावर जागा उपलब्ध करून न देता  ‘आऊट’वर खोळंबवून ठेवण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. देशाच्या चारही दिशांकडे नागपूरमार्गे रेल्वेगाडय़ा धावतात. तसेच मध्य रेल्वे आणि दक्षिण- पूर्व- मध्य (द.पू.म.) रेल्वेच्या सीमा देखील नागपुरात आहे. नागपूर रेल्वेस्थानक मध्य रेल्वेच्या हद्दीत आहे. द.पू.म. रेल्वेच्या गाडय़ांचे हावडा मार्गावरून नागपूर रेल्वेस्थानकावर आगमन होते, परंतु या गाडय़ांना स्थानकावर तातडीने जागा उपलब्ध करून दिली जात नाही. त्यांना कळमना  रेल्वेस्थानक किंवा नागपूरच्या ‘आऊटर’वर थांबवले जाते. फलाट उपलब्ध नसल्याचे कारण यासाठी मध्य रेल्वेकडून देण्यात येते.

मध्य रेल्वे जाणीवपूर्वक हावडाकडून येणाऱ्या गाडय़ांना रेल्वेस्थानकावर जागा उपलब्ध करून दिली जात नाही. त्याचवेळी दिल्लीकडून येणाऱ्या गाडय़ांना मात्र स्थानकावर प्राधान्याने जागा दिली जाते. कारण ही गाडी मध्य रेल्वेच्या हद्दीत असते आणि तिला वेळेत दुसऱ्या झोनकडे हस्तांतरित करायची घाई असते, असा आरोप दपूम रेल्वेचा असतो. या मुद्यावरून रेल्वेच्या दोन्ही झोनच्या अधिकाऱ्यांमध्ये अनेकदा वादावादी होते.

रेल्वे नियंत्रक कक्षातील अधिकारी, मुख्य नियंत्रक, सहाय्यक संचालन व्यवस्थापक यांच्या पातळीवर हा वाद होतो. हे प्रकरण येथेच थांबत नाही तर कधीकधी वरिष्ठ विभागीय संचालन व्यवस्थापकापर्यंत पोहोचते आणि गाडीला विलंब का झाला, याची दररोज नोंद केली जाते. गोंदियाकडून येणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस आणि मुंबई-हावडा मेल (सकाळी ११.५) या दोन्ही गाडय़ा बऱ्याचवेळा समोरासमोर येण्याची स्थिती निर्माण होते. यावेळी आधी रेल्वेस्थानकावरून गाडी सोडण्यासाठी दोन्ही झोनच्या अधिकाऱ्यांमध्ये अनेक वेळा वाद होतात.

वाद का होतात..

रेल्वेगाडय़ांची उत्पादकता आणि वक्तशीरपणा जपण्याची जबाबदारी त्या-त्या रेल्वे झोनची असते. ज्या रेल्वे झोनमध्ये गाडीला विलंब होईल. त्यासाठी संबंधित झोनच्या अधिकाऱ्यांना जबाबदार ठरविले जाते. त्यामुळे प्रत्येक झोनच्या अधिकाऱ्यांमध्ये आपल्या झोनमध्ये धावत असलेल्या गाडय़ांना वेळेत शेजारच्या झोनकडे हस्तांतरित करण्यासाठी चढाओढ लागली असते, परंतु हे करत असताना दुसऱ्या झोनच्या गाडय़ांना अनेकदा ‘आऊटर’वर उभ्या केल्या जातात. त्यातून रेल्वे झोनच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद उद्भवतात.

रेल्वेमार्ग मोकळा नसेल आणि फलाटावर जागा उपलब्ध नसेल तर गाडीला कुठेतरी थांबवावेच लागेल, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील म्हणाले.

कळमना किंवा नागपूर रेल्वेस्थानकाच्या आऊटरवर गाडय़ा का अडवल्या जातात, याचे कारण मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक सांगू शकतील, असे दक्षिण- पूर्व- मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल म्हणाले.