राजेश्वर ठाकरे
नागपूर : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावरील भुयारी पूल, उड्डाण पूल आणि पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारीची दखल न घेतल्याने पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाआधी वन्यजीव उन्नत मार्ग खचण्याच्या घटनेला सामोरे जाण्याची नामुष्की महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर (एमएसआरडीसी) ओढवली आहे.
दरम्यान, या कामाचा दर्जा आणि उन्नत मार्ग खचण्याची घटना याचा संबंध नसल्याचा दावा एमएसआरडीसीने केला आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांच्या कार्यकाळात नागपूर-मुंबई ७०१ किलोमीटर लांबीच्या द्रूतगती महामार्गाचे काम सुरू झाले. त्याच्या कामातील गैरव्यहाराबाबत तक्रारी झाल्या. तरीही एमएसआरडीसीने लक्ष दिले नाही.
२ मे रोजी नागपूर आरंभिबदूपासून २१४ किलोमीटरच्या लोकार्पणाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. तो होण्यापूर्वीच नागपूरलगत महामार्गाच्या आरंभिबदूपासून १५ किलोमीटर अंतरावरील वन्यजीव उन्नत मार्ग खचला. त्यामुळे अभियंत्याने व्यक्त केलेला निकृष्ट दर्जाच्या कामाबाबतचा अंदाज खरा ठरला. परंतु याविषयी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी मौन बाळगून आहेत. ऐन लोकार्पणाच्या तोंडावर उन्नत मार्ग खचल्याने लोकार्पणाचा कार्यक्रमा पुढे ढकलण्याची नामुष्की एमएसआरडीसीवर ओढवली.
काय होती तक्रार?
वाशीम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या (पॅकेज ४) कामाबद्दल कंत्राटदार कंपनीचे अभियंता विश्वजीत गुप्ता यांनी या मार्गावरील भुयारी मार्ग, उड्डाण पूल यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार एमएसआरडीसीकडे तक्रार नोंदवली होती. त्यांची तक्रार महामार्गाच्या पॅकेज ४ म्हणजे १९२ ते २१७ किलोमीटर दरम्यानच्या कामाबाबत होती. त्यांच्या म्हणण्यानुसार कामाचे डिझाईन आणि रेखाटनाचे काम निकषानुसार झाले नाही, तसेच या कामाची त्रयस्थ एजन्सीने तपासणी केल्यानंतर २५ टक्के लोखंडच्या सळाखी काढून टाकण्यात आल्या. त्या सळाखी उड्डाण पुल, भुयारी मार्ग आणि पुलाच्या मजबुतीसाठी आवश्यक आहेत. तत्पूर्वी त्यांनी ही तक्रार प्रथम ते काम करीत असलेल्या कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकाकडे केली होती. पण त्याचे गांभीर्य समजून न घेताच त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. त्यानंतरही सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी या मार्गाची पाहणी करण्यासाठी आले त्यावेळी गुप्ता यांनी त्यांची भेटून याबाबतची तक्रार केली होती. त्यानंतर दोनच दिवसाने कमान खचली. अशाप्रकारचा गैरप्रकार इतर भुयारी मार्ग आणि छोटे पुल तसेच इतर कमानीमध्ये झाले आहे, असा गुप्ता यांचा दावा आहे.
‘‘गुप्ता यांनी तक्रार केली होती. ते बांधकाम २०१९ मध्ये झाले होते. त्या प्रकरणाची चौकशी झाली. त्यात काही तथ्य आढळून आले नाही. १५ व्या किलोमीटरमधील घटना पॅकेज-१ मधील आहे. आणि गुप्ता यांची तक्रार पॅकेज-४मधील आहे. या दोन्ही ठिकाणी बांधकामाचे तंत्रज्ञान वेगवेगळे आहे.’’-संगीता जयस्वाल, प्रकल्प संचालक, एमएसआरडीसी, नागपूर
हे का झाले?
महामार्गाचे काम करणाऱ्या एका खासगी कंपनीत १६ महिने काम केलेल्या एका अभियंत्याने उड्डाण पूल, भुयारी मार्ग व इतर पुलाचे काम निकृष्ट असल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडाळाकडे केली होती. मात्र त्याची दखल घेतली नाही. ‘लोकसत्ता’ने ऑगस्ट २०२१ मध्ये याबाबत वृत्त प्रकाशित केले होते.
कमान अपघातात कामगाराचा मृत्यू
समृद्धी महामार्गावरील वन्यजीव उन्नत मार्गाची कमान रविवारी कोसळली. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला, तर दोन जखमी झाले.