नागपूर : केंद्र शासनाने यंदा धान खरेदीवर मर्यादा घातल्याने अधिकचा धान कुठे विकायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे  निर्माण झाला आहे. पूर्व विदर्भातील धान उत्पादक जिल्ह्यात आधारभूत किंमतीवर खरेदी सुरू करण्याचे आदेश येऊनही अद्याप केंद्र सुरू झाले नाहीत. दरवर्षी रब्बी हंगामात धान उत्पादकतेच्या आधारावर धान खरेदी केली जाते. यंदा मात्र केंद्र शासनाने २०२१-२२ रब्बी हंगामासाठी पणन महासंघाला राज्यासाठी ११ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट ठरवून दिले. त्यानुसार महासंघाने त्यांच्याकडे धान खरेदीसाठी नोंदणी केलेल्या एकूण शेतकऱ्यांच्या संख्येच्या प्रमाणात प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट ठरवून दिले. उद्दिष्टापेक्षा अधिक धान केंद्राला खरेदी करता येणार नाही. राज्यात धान उत्पादक ९ जिल्ह्यात एकूण १ लाख ३३ हजार ४४३ शेतकऱ्यांनी पणन महासंघाकडे नोंदणी केली आहे, हे येथे उल्लेखनीय.

विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात धानाचे पीक घेतले जाते. चंद्रपूर जिल्ह्याला ३९,९२१ क्विंटलचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील २१ खरेदी केंद्रांवर ४८४३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. शेतकऱ्यांनी दोन एकरात धानाची लागवड केली असेल व एकरी २० क्विंटल उत्पादन झाले असेल तर जिल्ह्यात एकूण दोन लाख क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. त्यापैकी केवळ ३९,९२१ क्विंटल धान शासन खरेदी करणार आहे. उर्वरित धानाची विक्री कुठे करायची, असा प्रश्न आता धान उत्पादकांपुढे आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने खरेदीच्या उद्दिष्टात वाढ करावी, या मागणीसाठी गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात धान खरेदीला सुरुवात झाली नाही. गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी खरेदी केंद्राचे धर्मेद्र लिल्हारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी धान खरेदीच्या मर्यादेमुळे केंद्र सुरू झाले नसल्याचे सांगितले. या केंद्रावर केवळ २४ क्विंटल खरेदीची मर्यादा आहे. अशीच स्थिती अन्य केंद्रांची आहे. शेतकरी त्यांच्याकडील सर्व धान खरेदी करण्याचा आग्रह करीत आहे, त्यामुळे धान खरेदीत अडचण निर्माण झाली आहे.

चंद्रपूर जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल गोगीरवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी जिल्ह्यात धान खरेदीचे उदिष्ट वाढवून देण्यात यावे यासाठी प्रस्ताव पाठवल्याचे सांगितले.

जिल्हानिहाय खरेदीचे उद्दिष्ट

जिल्हा         शेतकरी नोंदणी          उद्दिष्ट (क्वि.)

नागपूर              १६८२               १३,८६५.१०

चंद्रपूर               ४८४३               ३९,९२१.९१

गडचिरोली        ४८८०               ४०,२२६.९१

भंडारा               ५९,६८५           ४,९१,९९६.५९

गोंदिया              ५८,१२०           ४,७९,०९५.९५

रायगड              ४१६९               ३४,३६५.९८

नांदेड               ३३                       २७२.०३

सिंधुदुर्ग            २२                       १८१.३५

कोल्हापूर          ०९                      ७४.१९

एकूण                १,३३,४४३       ११,००,०००