राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अनेक जण शिवसेनेतून शिंदे गटात दाखल झाले. परंतु, जिल्ह्यातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. पक्षाकडून कुणालाही विश्वासात न घेताच शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदावर डॉ. सुधीर कव्हर यांची नियुक्ती केल्याने शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे शिवसेनेत अंतर्गत धुसफूस वाढली आहे.
हेही वाचा >>>मुंबई विमानतळावर विमान उतरण्याआधीच इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न, प्रवासी पोलिसांच्या ताब्यात
शिवसेना (ठाकरे) गटाच्या जिल्हा प्रमुख पदावर नुकतीच जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुधीर कवर यांच्या नियुक्तीचे आदेश धडकताच शिवसेनेत नाराजी नाट्य उफाळून आले आहे. यासंदर्भात तातडीने स्थानिक जिजाऊ सभागृहात २८ जानेवारी रोजी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. जिल्ह्यातील शिवसैनिकांना विश्वासात न घेता व पक्षबांधणीसाठी योगदान न देणाऱ्याना जिल्हा प्रमुख पदावर नियुक्ती देण्यात आल्याने वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची चर्चा बैठकीत पार पडली. या बैठकीला उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, शहर प्रमुख, सर्कल प्रमुख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा >>>उच्च पदस्थांकडून न्यायधीशांच्या नियुक्तींवर तोंडसूख, ॲड. फिरदोस मिर्झा यांचे प्रतिपादन
अनेक पदाधिकारी उद्या मुंबईला जाणार असून पक्ष श्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त करणार आहेत. जिल्ह्यात एकसंघ असलेली शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या नवनियुक्तीच्या नाराजी नाट्यामुळे संघर्षाच्या उंबरठ्यावर उभी आहे. शिवसेनेतील अंतर्गत वाद वेळीच रोखला गेला नाही तर भविष्यात पक्षांतर्गत संघर्ष वाढण्याची शक्यता दिसून येत आहे.