अमरावती : इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात, यासाठी जिल्हा प्रशासनाने सज्जता ठेवली आहे. त्यानंतरही एखाद्या केंद्रावर विद्यार्थी कॉपी करताना आढळून आला, तर यापुढे ती शाळा ज्या संस्थेतर्फे चालविली जाते, त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात येईल, असे जिल्हाधिकारी आशीष येरेकर यांचे म्हणणे आहे.
मंगळवार १० फेब्रुवारीपासून बारावीची तर शुक्रवार २० फेब्रुवारीपासून दहावीची वार्षिक परीक्षा सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, दहावी-बारावी अशा दोन्ही परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात व्हाव्यात म्हणून संस्थाचालकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत संबंधितांना सूचना दिल्या आहेत.
मुळात परीक्षा केंद्र असलेल्या शाळा ताब्यात घेण्यापूर्वीच संबंधित संस्थाचालकांनी त्या नीट आणि स्वच्छ करुन द्यावयाच्या आहेत. विशेषत: ज्या ठिकाणी कॉपी लपवल्या जातात, ती प्रत्येक केंद्रावरील स्वच्छतागृहे स्वच्छ आहेत की नाहीत, याची खातरजमा करुन घेतली जाणार आहे.
ते म्हणाले, यासाठीची विशेष काळजी जिल्ह्यातील दहावीच्या १८७ पैकी ३४ आणि बारावीच्या १३७ पैकी ४३ केंद्रांवर मुद्दामहून घेतली जाणार आहेत. शिक्षण विभागाच्या पाहणीनुसार ही केंद्र उपद्रवी केंद्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
बड्या अधिकाऱ्यांच्या आता अचानक भेटी
परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, ग्रामीण पोलीस अधीक्षक, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व सचिव असे सर्व वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी कुणालाही न सांगता अचानक काही केंद्रांना भेटी देणार आहेत. निकाल कमी लागला तरी चालेल, परंतु जो निकाल लागेल, तो अत्यंत पारदर्शक व खराखुरा असावा, अशी काळजी यावर्षी जिल्हा प्रशासनातर्फे घेतली जाणार आहे.
८५ टक्के केंद्रांवर सीसीटिव्हीची नजर
यावर्षी अमरावती जिल्ह्यातून दहावीसाठी १८७ केंद्रांवर २८ हजार ५३१ विद्यार्थी, तर बारावीसाठी १३७ केंद्रांवर ३९ हजार ९३४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. जिल्हयातील एकूण केंद्रांपैकी ८५ टक्के केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. विशेषतः जिल्ह्यातील ३४ उपद्रवी आणि ४३ संवेदनक्षम केंद्रांवर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले असून, तिथे केंद्रप्रमुख आणि पर्यवेक्षकांची अदलाबदल करण्याचे आदेश राज्य मंडळाने दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांना सूचना दिल्या आहेत. परीक्षा काळात खंडित वीज पुरवठ्याची समस्या उद्भवू नये यासाठी महावितरणला सतर्क राहण्यास सांगितले आहे. विद्यार्थ्यांना वेळेवर केंद्रावर पोहोचता यावे यासाठी परिवहन मंडळाने जादा बसचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.

