बुलढाणा : अपवाद वगळता कोणतीही व्यक्ति स्वमर्जीने गुन्हेगार बनत नाही, अपरिहार्य परिस्थिती मुळे तो वाईट मार्गाला लागतो, जेलमध्ये जातो, सुटका झाल्यावर पुन्हा गुन्हा करतो आणि पुन्हा कारागृहात रवानगी हे दुष्टचक्र सुरूच राहते. याचे कारण आपले आणि परिवाराचे पालन पोषण करण्यासाठी काय करावे हे त्यांना कळत नाही.

हीच बाब लक्षात घेऊन बंदिवानांना रोजगाराचे प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा कारागृहाने पुढाकार घेतला आहे. कैद्याना आत्मनिर्भर करून चांगला नागरिक म्हणून जगता यावे, त्याचे भविष्य हा यामागील उद्धेश आहे.जिल्हा कारागृह प्रशाननाने ‘कैद्याना रोजगार प्रशिक्षण’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपयुक्त आणि स्तुत्य उपक्रमाला शेकडो बंदीवानाचाही उत्साही प्रतिसाद मिळत आहे, हे विशेष.

बुलढाणा कारागृहातुन मुक्त झाल्यानंतर त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, या उद्देशाने बुलढाणा जिल्हा कारागृहातील बंद्यांकरीता स्वयंरोजगाराचे धडे देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने येथील सेंट ग्रामिण प्रशिक्षण संस्थाच्या माध्यमातुन सहा दिवसांचे  अगरबत्ती आणि धुपबत्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

साडेतीनशे कैद्याना प्रशिक्षण

बुलढाणा जिल्हा कारागृहामध्ये ३५३ न्यायाधिन बंदी  आहे. या  बंद्यांना प्रशिक्षण देण्याचे सुसज्ज नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या तुकडीमध्ये ३२ बंद्यांना ‘फास्ट फुड’ बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.  दुसऱ्या तुकडीला  एक ते सहा मार्च या कालावधीत अगबत्ती व धुपबत्ती बनविण्याचे प्रशिक्षण विजय धर्माळे  यांनी दिले. प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थी बंद्यांना संस्थेमार्फत प्रमाणपत्र देण्यात आले.  पुढील प्रशिक्षण टप्प्यात  नर्सिग कोर्स, टेलरींग कोर्स, मोटार रिवायडींग असे विविध प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. कारागृह अधीक्षक संदीप भुतेकर, वरीष्ठ तुरंगाधिकारी मेघा बाहेकर, तुरुंगधिकारी एम.एस. पाटील, सेंट ग्रामिण प्रशिक्षण संस्थाचे संचालक संदीप पोटे, श्रीकृष्ण राजगुरे तसेच कारागृह अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले. यातून हा अभिनव उपक्रम यशस्वी होण्याची सुखद चिन्हे आहे.