उच्च न्यायालयाचे कौटुंबिक खटल्यात निरीक्षण

पत्नी स्वयंपाक करीत नाही, सासू-सासऱ्यांशी क्रूरपणे वागते, वारंवार माहेरी जाते अशाप्रकारचे सर्वसामान्य आरोप करून घटस्फोट मिळू शकत नाही. घटस्फोटासाठी पुरावे आणि प्रसंग न्यायालयात सिद्ध करावे लागतात, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पत्नीवर क्रूरतेने वागण्याचे आरोप करणाऱ्या पतीच्या घटस्फोटाची विनंती फेटाळली.

लक्ष्मीकांत आणि योगिता असे दाम्पत्याचे नाव आहे. ६ मे २००६ ला त्यांचा विवाह झाला. लक्ष्मीकांत हा भारतीय रेल्वेत नोकरीला आहे. लग्नानंतर काही दिवसाने पती-पत्नीत भांडणे सुरू झाली. त्यामुळे मे २००७ पासून ते वेगळे राहू लागले. दरम्यान, लक्ष्मीकांतने घटास्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला. मात्र, न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला. याला त्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर न्या. वासंती नाईक आणि न्या. अरुण उपाध्ये यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यावेळी लक्ष्मीकांतने सांगितले की, पत्नी माझ्याशी आणि आईवडिलांशी नीट वागत नाही. स्वयंपाक करीत नाही. वारंवार हॉटेलमध्ये जेवणाचा आग्रह करते. वेळ घालविण्यासाठी ती नेहमी तिच्या आईवडिलांकडे जाते. तिच्यामुळे आपल्याला नोकरी करता येत नाही.

लग्नानंतर काही दिवसांनीच ती माहेरी गेली व परत येण्यास नकार दिला. त्यामुळे घटस्फोट मंजूर करावा. मात्र, हे आरोप सिद्ध करण्यासाठी लक्ष्मीकांतने पुरेसे पुरावे सादर केले नाही. बायको क्रूरतेने वागते म्हणजे नेमके काय करते? नोकरीच्या ठिकाणी एकही हॉटेल नसताना तिने हॉटेलमध्ये जेवणाचा आग्रह कसा धरला? कुठे जेवण केले?  ती कशाप्रकारे आणि कुणाशी, केव्हा भांडण केले? याबाबत काही प्रसंग नमूद करणे आवश्यक आहे. लक्ष्मीकांतचे सर्व आरोप सामान्य आहेत. त्या आधारांवर पत्नीला क्रूर ठरवता येऊ शकत नाही. त्यासाठी ठोस पुरावे लागतात, असे मत व्यक्त करून उच्च न्यायालयाने लक्ष्मीकांतची याचिका फेटाळली. याशिवाय योगिता ही नांदायला तयार असल्याचेही न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले.