उच्च न्यायालयाचे कौटुंबिक खटल्यात निरीक्षण

विवाहानंतर दोनच वर्षांनी दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध निर्माण करून पतीने पत्नीसोबतचे संबंध खराब केले. हा प्रकार उघडकीस आल्यावर पत्नीने पतीला वाईट वागणूक दिली असेल किंवा ती घर सोडून गेली असेलही, पण यात चूक पतीचीच असून त्याला पत्नीला घटस्फोट देता येणार नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका कौटुंबिक खटल्यात नोंदविले.

सुधाकर आणि जोत्स्ना असे पती पत्नीचे नाव आहे. सुधाकरची १९८९ मध्ये पहिली पत्नी मरण पावली. तिच्यापासून त्याला एक मुलगी आहे. १९९४ मध्ये त्याने जोत्स्नाशी दुसरा विवाह केला. या विवाहाला दोन वष्रे होत नाही, तोच त्याने तिसऱ्या एका महिलेशी अनैतिक संबंध स्थापन केले. तिसऱ्या महिलेला एक बाळ झाला व सुधाकर त्याचे पालनपोषण करू लागला.

याची माहिती मिळाल्यानंतर त्याचे पत्नी जोत्स्नासोबत खटके उडू लागले. ते वेगळे राहू लागले. १९९६ मध्ये सुधाकरने पत्नी वाईट वागणूक देत असल्याच्या कारणावरून घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला. मात्र, न्यायालयाने तो फेटाळला. त्यानंतर जवळपास २० वर्षांनी पत्नी घर सोडून गेल्याने घटस्फोट मिळावा, अशी याचिका पुन्हा केली. कौटुंबिक न्यायालयाने ती फेटाळली. त्याविरुद्ध त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर न्या. वासंती नाईक आणि न्या. अरुण उपाध्ये यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने स्पष्ट केले की, सुधाकरने त्याचा विवाह अस्तित्वात असतानाही तिसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध ठेवले हे सिद्ध झाले आहे. अशात पत्नीने त्याला वाईट वागणूक दिली काय किंवा ती घर सोडून गेली काय, हे ग्राह्य़ धरता येऊ शकत नाही. पतीचे अनैतिक संबंध समजल्यानंतर पत्नीची ही कृती स्वाभाविक आहे. त्यामुळे वरवर तिची चूक वाटत असली तरी मूळ चूक ही पतीची असून स्वत:च्या चुकीसाठी घटस्फोट घेता येऊ शकत नाही, असे मत व्यक्त करीत याचिका फेटाळली.