नागपूर : दिव्यांची रोषणाई, फराळाचा गोडवा, नवीन वस्तूंची खरेदी, लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजेचा आनंद… अशा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होणाऱ्या दीपावली सणाची तयारी आता सुरू झाली आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यात दीपावलीचा उत्सव साजरा होणार असून, धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत विविध धार्मिक सण आणि पूजेचे मुहूर्त कोणते आहेत, याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. विशेष म्हणजे, ८ नोव्हेंबर रोजी नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाचा योग असून, सायंकाळी लक्ष्मीपूजनासाठी शुभ वेळही निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्रीय पंचांगकर्त्या विद्या राजंदेकर यांनी यंदाच्या दीपावलीतील सण, धार्मिक परंपरा आणि पूजेचे मुहूर्त यांची माहिती दिली आहे.

दीपावलीची सुरुवात कधी होणार?

दीपावली उत्सवाची सुरुवात ५ नोव्हेंबर रोजी रमा एकादशी, गोवत्स द्वादशी आणि वसुबारसने होईल. या दिवशी सवत्स गाईचे म्हणजेच वासरासह गाईचे पूजन करण्याची परंपरा आहे. गाईला धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान असल्याने या दिवशी तिची पूजा करून कृतज्ञता व्यक्त केली जाते.

धनत्रयोदशीला कोणती खरेदी शुभ?

६ नोव्हेंबर रोजी गुरुद्वादशी, धनत्रयोदशी, प्रदोष, धन्वंतरी जयंती आणि यमदीपदान आहे. या दिवशी वस्त्रे आणि अलंकारांची खरेदी करणे शुभ मानले जाते. तसेच घरातील धन, दागिने आणि मौल्यवान वस्तू स्वच्छ करण्याची परंपरा आहे. सायंकाळी घराबाहेर यमासाठी कणकेचा दिवा लावावा. या दिव्याची वात दक्षिण दिशेला ठेवून यमाची प्रार्थना करण्याची प्रथा आहे. यामुळे अपमृत्यूचे भय टळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

लक्ष्मीपूजन नेमके कोणत्या दिवशी आणि किती वाजता?

८ नोव्हेंबर रोजी नरकचतुर्दशी, अभ्यंगस्नान आणि लक्ष्मीपूजन आहे. या दिवशी पहाटे चंद्रोदयाच्या वेळी अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. सायंकाळी प्रदोषकाळात लक्ष्मीपूजन करावे. लक्ष्मीपूजनासाठी सायंकाळी ६.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत शुभ वेळ आहे. याशिवाय रात्री २ ते ३.३० या वेळेत लाभ मुहूर्त आहे. वृषभ या स्थिर लग्नाची वेळ सायंकाळी ६.०७ ते रात्री ८.०६ अशी आहे. प्रदोषकाळ सायंकाळी ५.४१ ते रात्री ८.११ पर्यंत आहे. त्यामुळे भाविकांना या वेळांनुसार लक्ष्मीपूजन करता येईल.

दिवाळी पाडव्याला कोणते विधी करावेत?

१० नोव्हेंबर रोजी कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा, अन्नकूट आणि गोवर्धन पूजा आहे. या दिवशी अभ्यंगस्नान करून गोपाळकृष्ण आणि गोवर्धन पर्वताचे पूजन करावे. अन्नकूट करून देवाला नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे. दिवाळीच्या या उत्सवकाळात मनात कोणतेही दुःख न ठेवता आनंदाने आणि उत्साहाने सण साजरा करावा, असे पंचांगकर्त्या विद्या राजंदेकर यांनी सांगितले.

भाऊबीजेचा मुहूर्त कधी?

११ नोव्हेंबर रोजी कार्तिक शुद्ध द्वितीया अर्थात भाऊबीज आणि यमद्वितीया आहे. या दिवशी अपराह्नकाळात चित्रगुप्त, यमदूत यांच्यासह यमाचे पूजन करून अर्घ्य देण्याची परंपरा आहे. भाऊबीजेनिमित्त भावाने बहिणीच्या घरी जाऊन भोजन करावे आणि तिचा सत्कार करावा. तसेच स्त्रियांनी चंद्राला आणि भावाला ओवाळण्याची प्रथा आहे. भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीचा उत्सव असलेल्या भाऊबीजेने यंदाच्या दीपावली उत्सवाची सांगता होईल.