शहरात दहा ठिकाणी आग सुदैवाने कुठेही प्राणहानी नाही

आतषबाजीमुळे वायू आणि ध्वनी प्रदूषणातून नागरिक आणि प्राणिमात्रांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी फटाके फोडणे टाळावे, असे आवाहन महापालिका प्रशासनासह पोलीस विभागाने केले होते

नागपूर : दिवाळीत सावधगिरी बाळगत फटाके उडवा, असे आवाहन महापालिकेने केले होते. तरीही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्याने लागलेल्या छोट्या-मोठ्या १० आगींमुळे शहर हादरले. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने या आगींवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठी हानी टळली. या घटनांमध्ये प्राणहानी न झाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. जरीपटका भागात एका फटाक्याचे दुकान असलेल्या इमारतीला आग लागल्याने या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.

आतषबाजीमुळे वायू आणि ध्वनी प्रदूषणातून नागरिक आणि प्राणिमात्रांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी फटाके फोडणे टाळावे, असे आवाहन महापालिका प्रशासनासह पोलीस विभागाने केले होते. तरीही नियमांचे पालन न करत शहरात मोठ्या प्रमाणात फटाके फुटले.  मात्र यादरम्यान विविध भागात आगीच्या १० घटना घडल्याचे समोर आले आहे. यंदा आगीच्या घटनांमध्ये गेल्या तीन वर्षांपेक्षा वाढ झाली आहे. इंदोरा परिसरात बारखोली चौक येथे तीन मजली इमारतीत खाली फटाक्याचे दुकान होते.  शेजारी फुटवेअर आणि किराणाचे दुकान होते. परिसरात फटाके फोडत असताना रात्री १०.३० वाजताच्या सुमारास परिसरातील फटाक्याच्या दुकानाला आग लागली. काही वेळाच आगीने रौद्ररूप धारण केले. इमारतीला आगीने विळख्यात घेतले. अग्निशमन विभागाला माहिती मिळताच दहा अग्निशमन गाड्या घटनास्थळी पोहचल्या. तिसऱ्याच्या माळ्यापर्यंत आग पोहचल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागली. अन्य दुकाने बंद असल्यामुळे दुकानातील साहित्य जळून खाक झाले. कैलाश चेलानी यांची ही इमारत होती. रोशनी ट्रडर्स, जय माताजी फुटवेअर ही दोन दुकाने जळाली. तीन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला यश आले.

दिघोरी परिसरात कीर्तीनगरातील एका घरात पणत्या लावताना आग लागली, या दोन्ही घटनेत घरातील साहित्य जळाले. या आगीवर परिसरातील नागरिकांनी आणि अग्निशमन विभागाने नियंत्रण मिळवल्याने मोठी घटना टळली. जयताळा येथे एका कबाडीच्या दुकानाला  आगीत मोठे नुकसान झाले.

 निवासी परिसरात असलेल्या या कबाडीच्या दुकानाला आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवले त्यामुळे मोठी घटना टळली. सदरला एसएफएस शाळेसमोर, रामदासपेठ येथे लेंड्रा पार्क परिसरात, केटीनगर ओसीयस बँके समोर, छावनीत न्यू कॉलनी परिसरात, पावनभूमी परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्याला लागलेली आग तात्काळ विझवण्यात आली. दिघोरी उड्डाण पूल खरबी चौक येथे किराणा दुकानाला आग लागली. यात दुकानातील साहित्य खाक झाले. हंसापुरी व टेकडी चौक, गुरुदेवनगरातील राजीव गांधी सभागृहासमोरील आणि वर्धा मार्गावरील रेडिसन हॉटेलच्या बाजूला कचऱ्याला आग लागली. याशिवाय बुद्धनगर चांभार नाला येथे गॅसच्या गळतीमुळे घरात आग लागली होती.

फटाक्यांमुळे १३ जखमी मेडिकल- मेयोत!

दिवाळीच्या दिवशी केलेली फटाक्याची आतषबाजी अनेकांवर उलटली आहे. फटाक्यामुळे भाजणे  वा अपघातामुळे सुमारे १३ रुग्ण मेडिकल व मेयो या रुग्णालयात नोंदवले गेले. तर खासगी रुग्णालयातही अशा रुग्णांवर मोठ्या संख्येने उपचार झाले. फटाक्याने भाजलेल्या रुग्णांत निम्म्याहून अधिक लहान मुलांचा समावेश आहे.उपराजधानीत गेल्यावर्षी करोनाच्या कडक निर्बंधामुळे नागरिकांना दिवाळीत फारसे फटाके फोडता आले नाही. त्यापूर्वी २०१९ मध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात पाऊस पडला होता. त्यामुळे सलग दोन वर्षे दिवाळीत फटाके फोडण्यावर मर्यादा आल्या. परंतु यंदा गरुवारी शहरात चांगले वातावरण होते. तसेच आता करोना नियंत्रणात असल्याने नागरिकांनी तुलनेत जास्त फटाके फोडले. परंतु त्या तुलनेत फटाक्यामुळे जखमी होणाऱ्यांची संख्या कमी आहे, असे मतही शासकीय व खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी नोंदवले.मेडिकलमध्ये गुरुवारी सात वर्षांच्या मुलापासून ४९ वर्षांच्या व्यक्तीपर्यंत फटाक्यामुळे भाजलेले ७ रुग्ण आले. पैकी एकाला जास्तच इजा झाली होती. तर इतर किरकोळ जखमींवर औषधोपचार करून त्यांना सुट्टी दिली गेली. तर मेयोत ६ रुग्ण आले.  त्यांच्यावर औषधोपचार करून सुटी दिली गेली. विविध खासगी रुग्णालयातही फटाक्यामुळे कमी- अधिक भाजलेले रुग्ण उपचाराला आल्याची माहिती अनेक डॉक्टरांनी दिली.

योग्य नियोजनामुळे वेळीच नियंत्रण

महापालिकेच्या अग्निशमन विभागात गेल्या काही दिवसांपासून मनुष्यबळाचा अभाव आहे. प्रशासनाकडे मनुष्यबळ वाढवण्यासाठी अनेकदा पत्र देण्यात आले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विभागातर्फे यावर्षी योग्य नियोजन करण्यात आले. अनेकदा आगीवर नियंत्रण मिळवणारी वाहने आहेत, तर चालक नाही आणि चालक आहे तर वाहन नाही अशी स्थिती महापालिकेत असते. यावेळी मात्र, कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करीत प्रशिक्षणार्थ्यांसह रात्रपाळीत केलेल्या योग्य नियोजनामुळे या घटनांवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले असल्याचे अग्निशमन विभागाचे अधिकारी राजेंद्र उचके यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Diwali festival nagpur fire fortunately there were no casualties anywhere akp