अमरावती: वारकरी संप्रदायाचे अभ्‍यासक आणि कीर्तनकार म्‍हणून ज्ञानेश्‍वर बंडगर यांची ओळख आहे. ते बंडखोर विचारांचे मानले जातात. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या महानुभाव अध्यासन केंद्र आणि सर्वज्ञ सेवा महिला मंडळाच्या वतीने ‘श्री चक्रधर स्वामी अवतार दिना’निमित्त त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. पण, ऐनवेळी त्यांचे व्याख्यान रद्द करण्यात आले. त्यावरून आता चांगलाच वाद उफाळून आला आहे. विद्यापीठाने कुणाच्या दबावाखाली व्याख्यान रद्द करण्याचा निर्णय घेतला का, याची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे.

नेमके घडले काय?

१५ सप्टेंबरला विद्यापीठ परिसरातील डॉ. श्रीकांत जिचकार मेमोरियल रिसर्च सेंटर सभागृहात या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानमालेचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे हे भुषवणार होते. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका देखील छापण्यात आल्या होत्या. पण, कोणतेही कारण न देता हे व्याख्यान रद्द झाल्याचे ज्ञानेश्वर बंडगर यांना कळविण्यात आले. त्यामुळे बंडगर यांनी लगेच समाज माध्यमांवर याबद्दल नाराजीची प्रतिक्रिया व्यक्त केली.

काय म्हणाले ज्ञानेश्वर बंडगर?

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींविषयी माझे व्याख्यान होणार होते. पण विद्यापीठाच्या प्रशासनाकडून व्याख्यान रद्द केल्याचे मला कळविण्यात आले आहे. मला आधी रितसर निमंत्रण देण्यात आले होते. पत्रिकाही छापण्यात आली होती. पण अचानक हे व्याख्यान रद्द झाल्याने वाईट वाटले. मी वारकरी संप्रदायाचा समतावादी विचार मांडतो. त्यामुळे काहीजणांनी माझ्याविषयी गैरसमज निर्माण केला आहे. व्याख्यान रद्द झाले असले तरी मी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींविषयी बोलणार आहे, असे ज्ञानेश्वर बंडगर यांनी म्हटले आहे.

Dnyaneshwar Bandgar Amravati University Lecture Cancellation
वारकरी संप्रदायाचे अभ्‍यासक ज्ञानेश्‍वर बंडगर यांचे व्‍याख्‍यान ऐनवेळी रद्द करण्यात आले आहे. (फोटो- लोकसत्ता टीम)

व्याख्यान तर होणारच…

विद्यापीठाने व्याख्यान रद्द केले, पण व्याख्यान तर होणारच अशी भूमिका ‘आम्ही अमरावतीचे लोक’ या संघटनेने घेतली आणि १५ सप्टेंबरलाच संत गाडगेबाबा समाधी मंदिर सभागृहात त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले. संत गाडगेबाबा हे बंडखोर संत होते. त्यांच्या नावाच्या विद्यापीठात बंडखोर प्रबोधनकाराचे भाषण चालत नाही, हे हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

विद्यापीठ प्रशासनाचे म्हणणे काय?

विद्यापीठाच्या महानुभाव अध्यासन केंद्राच्या वतीने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. पण, सलग सुट्टयांमुळे विद्यापीठात विद्यार्थी उपस्थित नाहीत. व्याख्यानाला गर्दी न झाल्यास ते चांगले दिसणार नाही, असे आम्ही आयोजकांना कळवले. त्यांनी परस्पर बंडगर यांना व्याख्यान रद्द झाल्याचे कळवले. पण, त्यातून बंडगर यांचा गैरसमज झाला. पुढील काळात योग्य नियोजनातून विद्यापीठात त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करता येऊ शकेल, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी सांगितले.