नागपूर: बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांची नागपूरमध्ये पाच दिवसीय कथा सुरू आहे. ही कथा सुरू होण्यापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील एका वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. तर दुसरीकडे अंधश्रद्धा पसरवण्याचा आरोपही त्यांच्यावर झाला. अशातच नागपूरच्या डॉली चायवाला याने सोमवारी बागेश्वर बाबांच्या कथेला हजेरी लावली. इतकेच नव्हे तर त्याने येथे आरती केली आणि त्यानंतर धीरेंद्र शास्त्री यांच्याशी चर्चा केली. ल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातील लक्झरी लाईफस्टाईलमुळे तो चर्चेत असतो. आता त्याने त्याच्या चहाच्या ब्रँडचा विस्तार करण्याची योजना आखली आहे.
धीरेंद्र शास्त्री यांची दोन वर्षांपूर्वी नागपूर येथे कथा झाली होती. यावेळी अनेक विषयांवरून वाद निर्माण झाला होता. त्यांच्या दरबारावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला होता. त्यानंतर दोन वर्षानंतर नागपुरात पुन्हा एकदा त्यांची कथा सुरू आहे. सायंकाळी सहा वाजता रेशीम बागेतील मैदानावर कथेला सुरुवात होते. परंतु, कथेच्या पूर्वी अनेक लोक दर्शनाला येतात. तसेच सुरुवातीला आरती केली जाते. सोमवारी सायंकाळी चक्क डॉली चायवाला धीरेंद्र शास्त्री यांच्या दर्शनाला आला होता. यावेळी त्यांनी आरतीही केली. त्यानंतर धीरेंद्र शास्त्री यांनी त्याचे स्वागत केले.
धीरेंद्र शास्त्री महाराष्ट्रात लवकरच पदयात्रा काढणार
महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ डोके वर काढत आहे. त्यामुळे याला रोखण्यासाठी लवकरच महाराष्ट्रात पदयात्रा काढणार असल्याची माहिती धीरेंद्र शास्त्री यांनी दिली. ते म्हणाले, ‘लव्ह जिहाद’ ही मोठी समस्या झाली असून यावर कठोर कायदा येणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्रात पदयात्रा काढणार आहे. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत हिदुत्वासाठी जगणार असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी समाजातील वाढत्या व्यसनाधीनतेवरही प्रहार केला. आज श्रीमंत घरातील महिलाही मद्यपान करतात. आईच तशी झाली तर मुले कसे होणार, असाही प्रश्नही त्यांनी केला.
नागपूरमुळे भारतातील लोक ओळखायला लागले
नागपूरमुळे मला पूर्ण भारतातील लोक ओळखायला लागले. अन्यथा अजून दहा वर्षे लागले असते. नागपूरला आल्यावर लगेच संपूर्ण देश ओळखायला लागला. सर्व लोक भ्रमणध्वनीवर बागेश्वर बाबा कोण आहेत? अशी चर्चा करायला लागले. जे विरोध करतात त्यांना रोज धन्यवाद देतो. त्यांच्यामुळे आम्हाला प्रसिद्धी मिळाली. त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो. विरोध करणाऱ्यांमुळे आपण चुका कमी करतो, असेही ते म्हणाले.
