अमरावती: मेळघाटातील डोमा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत ‘भुताटकी’च्या अफवेनंतर सुमारे ६०० विद्यार्थी-विद्यार्थिनी घरी निघून गेल्या. त्यांना शाळेत परत आणण्यासाठी समुपदेशनाचे काम सुरू करण्यात आले असले, तरी अंधश्रद्धेचा पगडा दूर करण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागत आहेत.
नेमके घडले काय?
डोमा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत २६३ मुले आणि ३४५ मुली निवासी शिक्षण घेतात. गेल्या २२ जुलै रोजी चार मुली विचित्र वागू लागल्या. अचानकपणे रडणे आणि हसणे हा प्रकार सुरू झाल्यानंतर इतर मुली घाबरून गेल्या. शाळेच्या मुख्याध्यापकांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विद्यार्थिनींनी डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना कोणताही आजार नसल्याचे सांगितले. पण, यादरम्यान या विद्यार्थिनींचे पालक आश्रमशाळेत पोहचले आणि या मुलींना घरी घेऊन गेले. त्यानंतर इतरही मुले-मुली घरी निघून गेली आणि शाळा ओस पडली.
आरोग्य तज्ज्ञांच्या पथकाची भेट
या घटनेनंतर आरोग्य तज्ज्ञांच्या एका पथकाने आश्रमशाळेला भेट दिली. त्यांनी मुला-मुलींची भेट घेऊन घटनाक्रम जाणून घेतला. हा भुताटकीचा प्रकार नाही. ही मानसिक तणावाशी संबंधित स्थिती असू शकते, असे आदिवासी विकास विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. काही मुलींच्या असामान्य वागणुकीनंतर अनेक कथा सांगण्यात येऊ लागल्या. त्यानंतर गावातील काही महिलांमध्येही तशीच मानसिक लक्षणे दिसू लागली, असे अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे.
मोहाचे झाड तोडल्याचा परिणाम?
आश्रमशाळेच्या जागेत आधी एक मोह वृक्ष होता. पण, शाळा व्यवस्थापनाने ते झाड तोडल्याने ‘आत्मे’ संतप्त होऊन विद्यार्थ्यांना त्रास देऊ लागले, अशी अफवा पसरली. दुसरीकडे, शाळेतील गटाराचे पाणी मागेच असलेल्या एका मंदिरात शिरले आणि त्यामुळे देवता नाराज झाली, असेही बोलले जाऊ लागले. शाळेजवळच्या एका शेतात आदिवासी तरूणाचा मृत्यू झाला होता, त्याचा आत्मा भूत बनला, असे तिसरे कारण सांगितले जात असल्याचे अहवालात म्हटले आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे समूपदेशन
हा प्रकार ‘मास हिस्टेरिया’ म्हणजेच तीव्र मानसिक तणावाशी संबंधित असण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. शाळेत भूतासारखी कोणतीही अलौकिक शक्ती किंवा प्रकार घडलेला नाही. मुलांच्या मनामध्ये भीती बसल्याने ही अफवा पसरली आहे. आम्ही अंनिसचे कार्यकर्ते स्वतः त्या आश्रमशाळेत रात्री राहिलेले आहोत, असे स्पष्ट करत अंनिसच्या कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. मुलींचे शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी त्यांनी पालकांना आणि विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत परतण्याचे आवाहन केले आहे. समुपदेशनानंतर अनेक विद्यार्थिनी पुन्हा शाळेत जाण्यास तयार झाल्या आहेत.
