नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ५ जूनला होणार आहे. परंतु, ऐन परीक्षेच्या तोंडावर नूतनीकरणाच्या नावाने जुने मॉरिस कॉलेज परिसरात असलेल्या भारतीय प्रशासकीय पूर्व परीक्षा प्रशिक्षण केंद्रातील अभ्यासिका आणि वसतिगृह आठ महिन्यांपासून बंद करण्यात आले आहे. शासनाच्या अशा धोरणामुळे राज्याचा प्रशासकीय सेवेतील टक्का कसा वाढणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाकडून नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी नागपुरात प्रशिक्षण केंद्र तयार करण्यात आले आहे. मुंबई पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचे हे केंद्र आहे. दरवर्षी जवळपास १२० च्या वर विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षा ते मुलाखतीपर्यंतचे प्रशिक्षण दिले जाते. सध्या प्रशिक्षण केंद्राच्या वसतिगृहामध्ये १२० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह उभारण्यात आले आहे. करोना काळात या संस्थेतील इमारत आणि वसतिगृहाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री आणि  पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जवळपास दीड कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. सध्या अभ्यासिका वातानुकूलित करण्याचे काम सुरू आहे. ६० खोल्यांपैकी २४ खोल्या ‘पीडब्ल्यूडी’ने संस्थेला हस्तांतरित केल्या आहेत.  काही खोल्यांच्या स्वच्छतेचे काम बाकी आहे. आता केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा ५ जूनला होणार आहे. परंतु,  कामाच्या संथ गतीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासिका आणि वसतिगृह मिळत नसल्याने प्रशासनाबाबत नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.

वसतिगृहाच्या नूतनीकरणाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून केवळ स्वच्छतेचे काम आता सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची केंद्राला काळजी असून वेळोवेळी बांधकाम विभागाशी याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे वसतिगृह आणि अभ्यासिका लवकरच विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत.

– डॉ. प्रमोद लाखे, संचालक, प्रशासकीय पूर्व परीक्षा प्रशिक्षण केंद्र.