यवतमाळ : जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेले दिग्रस शहर सध्या अनेक तरूण विद्यार्थ्यांसाठी स्वप्नांना दिशा देणारे शहर ठरले आहे. दिग्रस नगर परिषदेने युवकांसाठी सुरू केलेली डॉ एपीजे अब्दुल कलाम नगर परिषद ई अभ्यासिका केवळ अभ्यास करण्याचे ठिकाण नाही, तर युवकांच्या आशा, आकांक्षा पूर्ण करणारे स्थळ ठरले आहे. शहराच्या मध्यवस्तीत नगर परिषद कन्या शाळेच्या मागे असलेल्या या अभ्यासिकेतून तब्बल ७२ जण शासकीय सेवेत दाखल झाले आहेत.
शहरातील युवकांसाठी अभ्यासिका असावी या धोरणात्मक दूरदृष्टीने स्थानिक आमदार, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी या अभ्यासिकेसाठी निधी उपलब्ध करून दिला. तत्कालीन मुख्याधिकारी शेषराव टाले यांनी यावर अंमलबजावणी करत अभ्यासिका उभी केली. येथे अभ्यास करणाऱ्या युवकांनी मिळवलेल्या यशाने अभ्यासिकेचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.
सध्या ४० युवक आणि ३५ युवती अभ्यासिकेचा लाभ घेत आहेत. मुलींसाठी वेगळी जागा, संगणक, प्रिंटर, भरपूर पुस्तके, हवेशीर मोकळी जागा, प्रसाधन गृह, पिण्याचे थंड पाणी, कुलर, पंखे, लाईट, इन्व्हर्टर आणि अभ्यासासाठी टेबल, खुर्च्या अशा सर्व भौतिक सुविधा येथे विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती अभ्यासिकेचे व्यवस्थापक महमंद याकूब यांनी दिली.
या सुविधांचा सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालावर झालेला आढळून येतो. यावर्षी २० विद्यार्थ्यांनी विविध शासकीय विभागात नोकऱ्या मिळवून आपलं आणि कुटुंबाचं आयुष्य उजळवलं. अभ्यासिका सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण ७२ तरुणांनी यशस्वीपणे शासकीय सेवेत पाऊल ठेवले आहे.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम फोरमच्या वतीने सत्कार यावर्षी शासकीय नोकरीत निवड झालेल्या यशस्वी तरुणांचा सत्कार डॉ. एपीजे अब्दुल कलाम फोरमच्या वतीने नुकताच करण्यात आला. यावेळी तुषार राठोड (शिक्षक), कैलास राठोड, शुभम घोंगडे (भांडारपाल), नितेश गव्हाणे, मोहिस शेख, भागेश गावंडे, तौफिक शेख (पोलीस), सागर बेले (ज्येष्ठ लिपीक), सुधीर मनवर, आकाश राठोड, नम्रता कीर्तने (लिपीक), नागेश्वर चव्हाण, तुकाराम पवार (आरोग्य विभाग), करण राठोड (अभियंता), अंकुश गावंडे, वैष्णवी भाकरे (तलाठी), सिद्धार्थ खंडारे, ललिता राठोड, संगीता डवरे, गुंजन गाडे (मंत्रालयीन लिपीक) या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतुल पंत, आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू प्यारेलाल पवार, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, फोरमचे अध्यक्ष फिरोज खान, सचिव आमीन चौहान आदी उपस्थित होते.