नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्ताने संपूर्ण नागपूरभर आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या प्रमाणात उत्सवाची तयारी केली आहे. शहरभरात विविध ठिकाणी जयंतीसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संगीत संध्याचेही आयोजन करण्यात आले असून चौकाचौकात मोठमोठी फलक लावण्यात आलेत. यात सत्ताधारी पक्षाते नेते, कार्यकर्ते आघाडीवर आहेत.

जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी त्यांच्याकडून मोठी रसद पुरवण्यात येत आहे. विरोधक मात्र यात मागे असल्याचे चित्र आहे. सरकारकडून अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्यात येत आहे. हा प्रकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर निर्मित संविधानाविरोधात असल्याची टीका होत आहे. आंबेडकर जयंतीच्या उत्सवादरम्यानच उपवर्गीकरणावर सूचना व हरकती मागवण्यात आल्यानेही टीका झाली.

अखेर त्याची मुदत वाढवण्यात आली. उपवर्गीकरणामुळे होत असलेल्या टीकेवरून लक्ष विचलित करण्यासाठी आणि आंबेडकरांचे अनुयायी असल्याचे दाखवण्यासाठी हे होत असल्याचे बोलल्या जात आहे. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात देशभर साजरी करण्यात येत आहे. त्याची तयारी आठ दिवसापूर्वीपासूनच विविध संघटना, संस्थांकडून करण्यात आली आहे.

१३ एप्रिलपासूनच कार्यक्रमाची सुरुवात झाली. १३ च्या रात्रीच संविधान चौकासह शहरातील अनेक भागात रात्री १२ च्या ठोक्याला केक कापून जन्मदिन साजरा करण्यात आली. तर १४ एप्रिला सुद्धा विविध ठिकाणी केक कापण्यासोबतच भोजनदानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी संगीत संध्याचेही आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षी सत्ताधारी पक्षातील नेते यात सहभागी घेतात. परंतु यंदा हा सहभाग तुलनेत जास्त असल्याची चर्चा आहे.यावेळी गेल्या काही वर्षांतील आंबेडकरी जयंतीच्या कार्यक्रमापेक्षा वेगळे चित्र आहे. संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात फलक, विद्युत रोषनाई कार्यक्रम होत आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक रसदही पुरवण्यात आली.यामागे राजकीय अर्थकारण असल्याचे बोलल्या जात आहे.

विविध ठिकाणी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सत्ताधाऱ्यांनीपुढाकार घेतला आहे. यंदा विरोधक मात्र त्यांच्या तुलनेत काहीसे मागे पडल्याचे चित्र आहे. उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आंबेडकरी अनुयायांमध्ये नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न यातून होत असल्याची चर्चा होत आहे.