scorecardresearch

माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली ; समता प्रतिष्ठानकडून लपवाछपवी?

शासकीय यंत्रणाच अशी लपवाछपवी करून माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली करीत असल्याचा आरोप केला जात आहे.

नागपूर : राज्यात माहिती अधिकार कायद्याचे पालन होत नसल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)अंतर्गत समता प्रतिष्ठानने राबवलेले उपक्रम आणि त्यावरील खर्चाचा तपशील तब्बल तीन महिन्यांपासून उपलब्ध करून दिला नाही.

शासकीय यंत्रणाच अशी लपवाछपवी करून माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली करीत असल्याचा आरोप केला जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने विविध उपक्रम राबवण्यात आले. एप्रिल २०१६ पासून हे उपक्रम हाती घेण्यात आले होते. त्यासाठी सरकारने कोटय़वधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. यासंदर्भातील तपशील मिळावा म्हणून सामाजिक कार्यकर्ते नरसिंह शिवचरण बागडे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत १६ डिसेंबर २०२१ ला अर्ज केला. त्यानंतर द्वितीय अपील १ फेब्रुवारी २०२२ ला केला, परंतु त्यांना माहितीच मिळाली नाही. अखेर त्यांनी १० मार्च २०२२ ला राज्य माहिती आयोग खंडपीठ, नागपूर येथे अर्ज केला. तेथील सुनावणी अद्याप व्हायची आहे.

बागडे यांनी समता प्रतिष्ठानकडे डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीसाठी एकूण किती निधी प्राप्त झाला. त्यापैकी कोणकोणत्या बाबींवर किती खर्च झाला. किती अखर्चित निधी शासनाला परत करण्यात आला आणि त्यावेळी निधी वितरण करणारे अधिकारी कोण होते, आदी बाबींची तपशीलवार माहिती मागितली आहे.

दरम्यान, समता प्रतिष्ठानकडून माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन होत असल्याबद्दल बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्याशी संपर्क केला, परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

माहिती अधिकार कायद्याचा वापर करून माहिती मिळवणे अवघडच काम आहे. या कायद्याची पायमल्ली करण्याचा प्रयत्न शासनाच्या विभागांकडून अनेकदा होताना दिसतो. राज्यात माहिती अधिकार कायद्याची अंमलबजाणी करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करण्यात यावी. खंडपीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत.

– टी.एच. नायडू, माहिती अधिकार कार्यकर्ते.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dr babasaheb ambedkar research and training institute right to information act zws

ताज्या बातम्या