नागपूर : एका प्रसिद्ध गीतातील ओळी, ‘तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची ‘सही हाय रं…’, यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे झालेल्या परिवर्तनाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे. बाबासाहेबांची स्वाक्षरी (सही) ही या गीतापर्यंत मर्यादित न राहता आज आंबेडकरी चळवळीचे नवे प्रतीक म्हणून समोर येत आहे.
नव्या रूपात वैचारिक परंपरा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची परंपरा नव्या रूपात पुढे येत असून, त्यांच्या स्वाक्षरीने (सहीने) आज एक वेगळे सांस्कृतिक आणि सामाजिक प्रतीक धारण केले आहे. वाहनांच्या काचांपासून टी-शर्ट, मोबाईल कव्हर, भित्तिचित्रे आणि सोशल व चारचाकी वाहनांच्या मागील काचांवर बाबासाहेबांची स्वाक्षरी मोठ्या प्रमाणावर दिसून येते. काही युवक ती गाडीच्या नंबर प्लेटवर किंवा स्टिकरच्या स्वरूपात लावतात. ही स्वाक्षरी म्हणजे आमच्या अस्तित्वाची ओळख आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या हक्कांची आठवण आम्हाला दररोज होते, असे नागपूरमधील अभिषेक कांबळे या तरुणाने सांगितले. फॅशनच्या क्षेत्रातही या स्वाक्षरीने वेगळे स्थान निर्माण केले. टी-शर्ट, हूडी, कॅप यांसारख्या वस्तूंवर बाबासाहेबांची स्वाक्षरी वापरण्याचा ट्रेंड वाढत आहे. हे फक्त कपडे नाहीत, ही आमची विचारधारा आहे. आम्ही काय मानतो, हे सांगण्याचा हा मार्ग आहे, असेमहाविद्यालयीन विद्यार्थिनी प्राची मेश्राम हिने सांगितले.
कला क्षेत्र ते आंदोलनापर्यंत
कलाक्षेत्रातही याचा प्रभाव दिसतो. ही स्वाक्षरी म्हणजे संघर्ष आणि स्वाभिमानाचा इतिहास आहे. आम्ही ती कला म्हणून नाही, तर संदेश म्हणून मांडतो, असे स्थानिक कलाकार सचिन उईके यांनी स्पष्ट केले. सामाजिक आंदोलनांमध्येही बाबासाहेबांची स्वाक्षरी ही बॅनर,पोस्टर आणि फ्लेक्सवर झळकते. त्यामुळे ती एकप्रकारे चळवळीची ओळख बनली आहे. ही स्वाक्षरी केवळ ट्रेंड नाही. प्रत्येक काळात प्रतीक बदलतात, पण मूल्ये कायम राहतात. बाबासाहेबांची स्वाक्षरी ही त्या मूल्यांची आधुनिक अभिव्यक्ती आहे, असे प्रा. डॉ. सीमा देशमुख यांनी सांगितले.
समाज माध्यमांवरही बाबासाहेबांच्या स्वाक्षरीची मोठी ‘क्रेझ’
इंस्टाग्राम आणि फेसबुकवर प्रोफाईल फोटो, स्टेटस, रील्समध्ये ती वापरली जात आहे. ‘सिग्नेचर स्टाईल’ चित्रफिती आणि पोस्ट्स मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहेत. आजच्या डिजिटल पिढीला जोडून ठेवण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे. बाबासाहेबांची ओळख नव्या स्वरूपात पोहोचते, असे सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर रोहन वानखेडे यांनी सांगितले. याशिवाय, अलीकडच्या काळात काही मराठी आणि हिंदी गाण्यांमध्येही बाबासाहेबांच्या स्वाक्षरीचा वापर किंवा उल्लेख होत आहे.
