अमरावती : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. कमलताई गवई यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे ‘डी. लिट्.’ (डॉक्टर ऑफ लेटर्स) ही सर्वोच्च मानद पदवी घोषित करण्यात आली आहे. मानवविज्ञान विद्याशाखेतील राज्यशास्त्र विषयात त्यांनी ‘विपश्यना : एक चिकित्सक अभ्यास’ या विषयावर सादर केलेल्या संशोधनाबद्दल हा गौरव करण्यात आला आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या त्या मातोश्री आहेत.
कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी डॉ. गवई यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यापीठाच्या वतीने त्यांचा सत्कार केला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, आचार्य कक्षाच्या उपकुलसचिव मिनल मालधुरे, प्राचार्य डॉ. कमलाकर पायस आणि दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा किर्ती अर्जुन आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यापीठाच्या आगामी दीक्षांत समारंभामध्ये डॉ. कमलताई गवई यांना ‘डी. लिट्.’ पदवी प्रदान करून सन्मानित केले जाणार आहे. विशेष म्हणजे, डॉ. कमलताई गवई यांनी २०१४ सालीच हा प्रबंध सादर केला होता.
डॉ. कमलताई गवई या महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार व बिहार, सिक्कीम, केरळचे माजी राज्यपाल दिवंगत दादासाहेब गवई यांच्या धर्मपत्नी, तसेच सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री आहेत. विवाहानंतर शिक्षण आणि बहुआयामी कर्तृत्व डॉ. कमलताई गवई यांचे बहुतांश शिक्षण पती रा. सु. गवई यांच्या प्रेरणेने विवाहानंतर पूर्ण झाले, हे विशेष. राज्यशास्त्र विषयात एम.ए. केल्यानंतर त्यांनी २००७ मध्ये राजकारण व प्रशासन विषयात आचार्य (पीएचडी) पदवी प्राप्त केली. यासोबतच त्यांनी डी.एड., बी.एड., शिलाई, हस्तकला ते पशुसंवर्धन व शेती व्यवसायापर्यंतचे विविध व्यावसायिक शिक्षणही घेतले आहे.
त्यांनी ‘मूल्यातून निपजलेले रत्न’, ‘कल्याणी’, ‘दिपस्तंभ’, ‘आंबेडकरी चळवळीतील एक संघर्ष पर्व’ यांसह अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान देत त्यांनी अमेरिका, इंग्लंड, रशिया, जपान, जर्मनीसह विविध देशांमध्ये शैक्षणिक कार्यासाठी दौरे केले आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना यापूर्वी साहित्य अकादमी पुरस्कार (१९६९), महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार (२००७) आणि जीवन गौरव पुरस्कार (२०१७) यांसारख्या अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.कमलताई गवई यांना ‘डी. लिट्.’ जाहीर झाल्याबद्दल विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
