शहरातील कचरा उचलण्याचे कंत्राट मे. कनक र्सिोसेस मॅनेजमेंट लि. या कंपनीला २००८ मध्ये सोपविल्यानंतर महापालिकेचे आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर आणि यांची कंपनीला लाभ मिळवून देण्यासाठी मनपा व कंपनी यांच्यामध्ये झालेल्या करारनाम्यातील अटी व शर्तीच बदलविल्याचे उघड झाल्यामुळे स्थायी समितीने डॉ. गणवीर यांना तात्काळ निलंबित करून विभागीय चौकशीचे आदेश दिले. महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या कृपादृष्टीमुळे हा प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे येणाऱ्या दिवसात अजूनही काही अधिकाऱ्यांवर गदा येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. डॉ. गणवीर गेल्या अनेक महिन्यांपासून रजेवर असून सप्टेंबर महिन्यात ते सेवानिवृत्त होणार आहे.

शहरात घरोघरी कचरा उचलण्याचे कंत्राट नागपूर महापालिकेने मे. कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट लि. या कंपनीला १ मार्च २००८ मध्ये हा करारनामा दहा वर्षांसाठी म्हणजे ३१ मे २०१८ पर्यंत हा करार करण्यात आला. कचरा गोळा करणे व तो भांडेवाडीतील डंपिंग यार्डमध्ये पोहचविण्याचे काम कनकडे आहे. त्यासाठी ४४९ रुपये प्रतिटन इतका दर निश्चित करण्यात आला. इंधन व अन्य खर्चात बदलत्या दरानुसार वाढ देण्याचे निश्चित करण्यात आले.

त्यानंतर कनकला दिल्या जाणाऱ्या प्रतिटन दरात वाढ करण्यात आली. ती १०३३. ८८ रुपये प्रतिटन इतकी होती. एप्रिल २०१६ पासून पुढील तिमाहीसाठी कनकने १६०६.६९ रुपये प्रतिटन इतक्या दराने देयके सादर केले. कामगारांना कामगार विभागाच्या अधिसूचनेनुसार वाढीव वेतन द्यावे लागत असल्याचे कारण देत ही वाढ कंपनीने मागितली.

कंपनीने मागणी केलेले दर जास्त वाटत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालत त्याची तपासणी केली. त्यामुळे मूळ निविदेत अटी व शर्थीचा भंग करून आजवर कनक महापालिकेला लुटत असल्याचे स्पष्ट झाले. कंपनीने आपल्या कामगारांना किमान वेतन देणे अपेक्षित असताना त्याचेही पैसे महापालिकेला मागितले आणि कचरा घोटाळा समोर आला असून स्थायी समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली असताना डॉ. गणवीर यांनी तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देऊन या प्रकरणाची आयुक्त चौकशी करतील असे आदेश दिले.

दरम्यान, येत्या वर्षभरात नव्याने निविदा प्रक्रिया पूर्ण करून कचरा उचल करण्यासाठी नवीन कंपनी नियुक्ती केली जाणार आहे. कर नवीन कंपनी येईल तोपर्यंत १३०६. ८७ रुपये प्रतिटन इतक्या दराने कनककडून कचरा उचलण्याचे काम करून घेतले जाणार आहे.

सध्या स्थितीत शहरातून ९०० ते १००० मेट्रीक टन कचरा दररोज गोळा केला जात आहे. मूळ निविदेतील अटी व शर्थीमध्ये करारनाम्यानंतर बदल करण्यात आला.

त्याचाच आधार घेत कनकने वाढीव पैसे मागितले आहे. त्यामुळे महापालिका प्रशानाने मूळ निविदेतील अटी व शर्थीची बांधील असायचे की करारनाम्यातील अटी-शर्थीशी याबाबत पेच निर्माण झाला आहे. या संदर्भात महापालिकेतील ज्येष्ठ विधितज्ज्ञांशी चर्चा करण्यात येईल. तज्ज्ञांचे अभिमत प्राप्त झाल्यानंतर चौकशी केली जाईल.

८ मध्ये स्थायी समितीची मान्यता घेऊन निविदा प्रक्रिया पूर्ण करत कनकला काम देण्यात आले मात्र प्रत्यक्ष करारनामा करताना कनकला अनुकूल ठरतील अशा पद्धतीने अटी व शर्थीमध्ये बदल करण्यात आला. अर्थात मूळ निविदेतील अटी व शर्थी बदलविण्यात आल्या. यासाठी स्थायी समितीला साधी विचारणा करण्यात आली नाही. करारनाम्यापासून कचरा घोटाळा सुरू झाला असून महापालिकेचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांविरोधात महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक आणि शिस्त व अपील नियम १९७९ अन्यवये विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. कचरा घोटाळ्याविषयी ज्या समिती चौकशी करीत आहेत त्या बंद करून महापालिका आयुक्त अश्विन मुदगल या प्रकरणाची चौकशी करतील आणि स्थायी समितीला अहवाल देतील. चौकशी अहवाल येईपर्यंत कनकला पैसा दिला जाणार नाही.

– संदीप जाधव, स्थायी समिती अध्यक्ष