अमरावती : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा आमचा पक्ष तसेच प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाविकास आघाडीसोबत असता तर महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रात आणखी पाच ते सहा जागा वाढल्या असत्या, असे मत रिपाइं गवई गटाचे नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी व्यक्त केले.

महाविकास आघाडीने रिपाइं गटाला सोबत घेतले असते, तर आणखी चांगले परिणाम पहायला मिळाले असते, पण दुर्देवाने ते होऊ शकले नाही, अशी खंत डॉ. गवई यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. ते म्हणाले, महाविकास आघाडीने आता विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीसह रिपाइंला सोबत घ्यावे. आम्ही सोबत असलो तर महाविकास आघाडीला राज्यात मोठा फायदा मिळेल. रिपाइं गवई गटाला महाविकास आघाडीने राज्यात निवडणूक लढविण्यासाठी विधानसभेच्या १० जागा द्याव्यात, अशी आमची मागणी आहे.

हेही वाचा >>>लोकसभेतील पराभवानंतर नवनीत राणा पहिल्यांदाच माध्यमांसमोर; म्हणाल्या, “अमरावतीकरांनी…”

सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले हे अवघ्या ३२ हजार मतांनी निवडून आले. तेथे आमच्या उमेदवाराला ३८ हजार मते मिळाली. महाविकास आघाडीने आमच्या सोबत युती केली असती तर साताऱ्याच्या जागेवर देखील महाविकास आघाडीचा विजय झाला असता, असे डॉ. गवई म्हणाले.

लोकसभा निवडणुकी संदर्भात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना भेटण्यापूर्वी मी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र, त्यावेळी त्यांनी कुठलाही शब्द दिला नसल्यामुळे काँग्रेस सोबत राहण्यासंदर्भातला आमचा निर्णय झाला नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अवघ्या तीन तासांपूर्वी यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखडे माझ्या घरी आले होते. आमच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली. मात्र, तीन तासात असा कुठलाही विचार केला जात नाही, त्यामुळे आम्ही अमरावतीत निवडणूक लढवली असल्याचे डॉ. गवई यांनी सांगितले.

हेही वाचा >>>गडचिरोली : ‘पुट्टेवार’ हत्याकांड; अर्चना पुट्टेवार, प्रशांत पार्लेवारची अटक टाळण्यासाठी काँग्रेस नेत्याची…

आम्ही आमच्या विचाराशी कायम ठाम राहिलो. यामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करताना आम्ही त्यांचे बोधचिन्ह घेतले नाही. यापुढे देखील आम्ही महायुती सोबत गेलो तरी आमच्याच पक्षाचा ‘एबी फॉर्म’ राहील, असे गवई यांनी स्पष्ट केले.

दर्यापूरमधून विधानसभा निवडणूक लढणार

दर्यापूर विधानसभा मतदारसंघात मी स्वतः निवडणूक लढणार आहे. महाविकास आघाडीने आम्हाला सोबत घेतले तर दर्यापूरमध्ये मी महाविकास आघाडीचा उमेदवार असेल. अशा परिस्थितीत खासदार बळवंत वानखडे हे माझा प्रचार करतील. जर महाविकास आघाडीने आम्हाला सोबत घेतले नाही, तरी देखील मी स्वतंत्ररित्या दर्यापूर विधानसभा निवडणूक लढणार आहे, असे डॉ. गवई यांनी सांगितले.