अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा खरा नायक हा लेखक आणि साहित्यिक असून त्यानंतर प्रकाशक आहे. त्यामुळे संमेलनात प्रकाशकांना किती महत्त्व असायला पाहिजे, याचा विचार केला पाहिजे, असे मत घुमानमध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. मारवाडी फाऊंडेशनतर्फे दिला जाणाऱ्या प्रबोधनकार ठाकरे पुरस्काराच्या निमित्ताने नागपुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, कुठल्याही संमेलनात प्रकाशकांचे वाद समोर येत असले तरी मुळात साहित्य संमेलनाचा खरा नायक लेखक, साहित्यिक, समीक्षक असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी हे संमेलन असते. पुस्तकांची विक्री आणि वाचकांना ग्रंथसंपदेची ओळख व्हावी, या उद्देशाने प्रकाशकांना पुस्तक विक्रीसाठी स्थान दिले जाते. मात्र, प्रत्यक्ष संमेलनात त्यांचा फारसा सहभाग राहत नाही. त्यामुळे प्रकाशकांनी आपली भूमिका काय आहे, याचा विचार केला पाहिजे. संमेलनावर होणारा खर्च किती करावा, याचे भान संबंधित आयोजक संस्थेने केला पाहिजे. ज्यांची क्षमता आहे ते खर्च करतात आणि त्यांची नाही ते आपल्या पद्धतीने त्याचे नियोजन करतात. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानाचे असले तरी या संदर्भात साहित्यिकांमध्ये मतभेद आहेत. महामंडळाची भूमिका असली तरी साहित्यिकांमध्ये यावर एकमत होत नसल्याने अनेक चांगले लेखक, कवी यापासून वंचित राहतात, हे खरे आहे. निवडणूक म्हटली की, कितीही मोठा साहित्यिक असो त्याला आपली ओळख, साहित्य संपदा आणि परिचय मतदारांसमोर ठेवावा लागतो. त्यात काही गैर आहे, असे वाटत नाही.
घुमानमधील संमेलनानंतर वर्षभर केलेली कामे आणि मिळालेल्या सन्मानामुळे समाधानी आहे. अध्यक्षपदाचा एक वर्षांचा कार्यकाळ कमी पडतो, असे काही नाही. या कार्यकाळात साहित्यसेवा करता येऊ शकते. अध्यक्षपद सन्मानाचे असताना ते अपेक्षेचे पद आहे. अनेकांना अध्यक्षाकडून अपेक्षा असतात. त्या वर्षभराच्या काळात पूर्ण करता येऊ शकतात. संत वाङमय हा साहित्यातील वेगळा प्रकार असला तरी ते साहित्य आहे. देवधर्माचे साहित्य म्हणजे संत साहित्य, असे मानणे चुक आहे. जुन्या काळची भाषा नवीन पिढीसाठी कठीण असली तरी भाषा बदलून संत वाङ्मय लिहिता येते. संत साहित्य हा वाङ्मयाचा मुख्य प्रवाह आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
घुमानमध्ये अध्यक्षीय भाषणात ज्या मागण्या केल्या होत्या त्यातील अनेक मागण्यांबाबत सरकारने विचार केला आहे. विशेषत संत गुलाबराव महाराजांचे जन्मस्थान पुणे असल्यामुळे त्यांचे स्मारक त्या ठिकाणी व्हावे, ही मागणी मान्य झाली असून त्या संदर्भात प्रस्ताव नगरविकास विभागाने
पाठविला आहे.
घुमानमध्ये संत नामदेवांच्या नावाने महाविद्यालय सुरू करण्याची मागणी केली होती तेथे काम सुरू झाले असून दोन महिन्यात ते पूर्ण होईल, असेही मोरे यांनी सांगितले.

‘पुरस्कारवापसी चुकीचीच’
देशात असहिष्णुतेचे वातावरण असल्यामुळे पुरस्कार परत केले जात असले तरी ते चुकीचे आहे. मुळात पुरस्कार कोणी दिले आणि कशासाठी दिले आणि त्याचा देशातील असहिष्णुतेशी काय संबंध, याचा विचार केला पाहिजे. पुरस्कार परत करणे म्हणजे सरकारचा निषेध करणे, अशी जर समजूत असेल तर ते चुक आहे. निषेध करायचा असेल तर तो वेगळ्या पद्धतीने करता येऊ शकतो. त्यासाठी पुरस्कार पणाला कशाला लावला जातो हे कळत नाही. ज्यांनी पुरस्कार परत केले त्या लेखकांची पुस्तके परत करण्याचा प्रकार सुरू असेल तर ते योग्य नाही, असेही मोरे म्हणाले.