वर्धा : विविध विद्यापीठांच्या दीक्षांत सोहळ्यात मान्यवर व्यक्तींना डी.लिट, डी.एससी अशा मानद उपाधीने सन्मानित करण्यात येते. त्यांच्या कार्याप्रती व्यक्त केलेली ती सार्वजनिक कृतज्ञता असते. येथील सावंगीच्या दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन अभिमत विद्यापीठाच्या १५ व्या दीक्षांत सोहळ्यात यावर्षी तिघांना डॉक्टर ऑफ सायंन्स या उपाधीने सन्मानित करण्यात आले. तेव्हा यांचे योगदान काय, असे कुतूहल दिसून आले. त्यांना दिलेल्या सन्मानपत्रात त्यांच्या कार्याचा आढावा आहे. तो थोडक्यात असा… डॉ. शिवम ओम मित्तल पार्किंसन्स व्याधीचे तज्ञ् म्हणून जगभर ओळख झालेले डॉ. मित्तल हे याच मेघे अभिमत विद्यापीठातील पदवीचे माजी विद्यार्थी आहेत. पार्किंसन्स व्याधीचे निदान व उपचार यात तरबेज म्हणून आज त्यांचा बोलबाला आहे. अमेरिकेतील क्लिव्हलॅन्ड विद्यापीठातून मेंदूविकारावर विशेष प्रशिक्षण व पुढे जगात सर्वोत्तम रुग्णालय म्हणून मान्यता असलेल्या अमेरिकेतील मेयो क्लिनिक या संस्थेत अति विशेष प्रशिक्षण. सुप्रसिद्ध याले विद्यापीठातून शिष्यवृत्ती घेत त्यांनी आवडत्या विषयात विविध उपचार पद्धती विकसित केल्या. उत्तम न्युरोलॉजिस्ट म्हणून ख्याती झाल्यावर डॉ. मित्तल यांनी यूएई ( अबुधाबी ) येथे जगातील पहिले पार्किंसन्स केंद्र स्थापन केले. या व्याधिवर मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना जगभरातून निमंत्रण येत असतात. शिकावू न्युरोलॉजिस्ट साठी विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात पुढाकार घेणारे डॉ. मित्तल जगातील विविध संस्थांचे पदाधिकारी आहेत. हेही वाचा :Gondiya Updates: रेल्वेच्या धडकेत शेत मजुराचा मृत्यू माधुरी कानिटकर लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर या नाशिकच्या आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू आहेत. भारतीय सैन्यदलात तीन ताऱ्यांनी मानांकित अश्या त्या तिसऱ्याच महिला जनरल ऑफिसर होत. राष्ट्रपती पदकासह विविध मानसन्मान त्यांना मिळाले आहेत. सैन्यदलाच्या वैद्यकीय महाविद्यालयातून पदव्युत्तर तसेच एम्स दिल्ली, सिंगापूर, लंडन येथे त्यांनी विविध शिक्षण घेतले. स्वतः पुढाकार घेत पूणे व दिल्लीत बालकांसाठी किडनी उपचार केंद्र सूरू केले. सैन्यदलाच्या वैद्यकीय महाविद्यालयच्या त्या पहिल्या महिला अधिष्ठाता म्हणून लौकिक. सैनिक व सैनिक परिवारासाठी डॉ. कानिटकर यांनी देशभरात आरोग्य सेवा दिली. चंद्रपूर, गोंदिया व अन्य जिल्ह्यातील १८ आदिवासी गावात त्यांनी आरोग्य प्रकल्प राबविले. पदव्युत्तर व डॉक्टरेट पश्चात होणारे संशोधन हाच विद्यापीठाचा आत्मा होय, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. प्रा. मुकुंद एस. चोरघडे शिकागो येथील थिंक फार्मा व आयुर्विद्या हेल्थ केअर या विख्यात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या प्रा. चोरघडे यांनी पूणे येथून एम.एससी केल्यावर जॉर्जटाउन विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी मिळविली. पुढे हार्व्हड, व्हर्जिनिया विद्यापीठातून उच्च शिक्षण. जगभरातील प्रतिष्ठित वैद्यकीय संस्थांचे मानद प्राध्यापक. औषधी संशोधन तसेच पारंपरिक भारतीय व चायनीज औषधी तत्वचा विकास हा त्यांचा आवडीचा प्रांत आहे. ' केमिस्ट ऑफ इअर ' हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना तीन वेळा प्राप्त झाला असून पेटंट बाबत ते तज्ञ असल्याची मान्यता आहे. अमेरिकेतील विविध केमिस्ट संस्थांचे प्रा. चोरघडे हे पदाधिकारी आहेत. हेही वाचा :सुलभ आर्थिक धोरणावरच आत्मनिर्भरता अवलंबून; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे यांनी ही मानद उपाधी या तीन मान्यवरांना प्रदान करतांना आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली. या दीक्षांत सोहळ्यात केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मेघे विद्यापीठात आयुर्वेद महाविद्यालयात होत असलेले संशोधन देशात सर्वोत्कृष्ट असल्याची पावती याप्रसंगी दिली. आमदार डॉ. पंकज भोयर, संचालक सागर मेघे, डॉ. राजीव बोरले, कुलगुरू डॉ. ललित वाघमारे, प्र. कुलगुरू गौरव मिश्रा, राघव समीर मेघे, डॉ. उदय मेघे, डॉ. संदीप श्रीवास्तव, डॉ. जहिर काझी, डॉ. तृप्ती वाघमारे, कुलसचिव डॉ. श्वेता काळे पिसुळकर, डॉ. अनुप मरार, डॉ. एसएस पटेल व विविध विद्याशाखांचे अधिकारी उपस्थित होते.