नागपूर : भारतात आजही मानवी जनुकांबाबत माहिती कमी आहे, परंतु देशातील पाच केंद्रांत आता जनुकीय विदा संकलनावर (डेटाबेस) काम होत आहे, अशी माहिती लखनऊतील ‘संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स’च्या प्राध्यापक आणि विभागप्रमुख डॉ. शुभा फडके यांनी दिली. त्या भारतातील वैद्यकीय अनुवांशिकतेशी संबंधित संशोधनात काम करणाऱ्या ज्येष्ठ तज्ज्ञ आहेत.
इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, येत्या काळात जनुकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने मुलांना लहान असताना व पुढे मोठे झाल्यावर कोणते रोग होणार हे आधीच समजण्याची सोय झाली आहे. एका ‘डीएनए’ चाचणीमुळे आई-वडील आधीच मुलांना संभावित आजार जाणून घेऊ शकणार आहेत. सध्या अमेरिकेतील रुग्णालयात अशा जनुकीय चाचण्या आहेत. ही तपासणी महाग असल्याने भारतात त्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे भारतातील पाच वेगवेगळय़ा केंद्रांत या चाचण्यांतून विदासंकलन करण्यात येत आहे.
हे विदासंकलन कुणाची जनुकीय चाचणी झाल्यास त्यातील कमाल व किमान तपासणीची मर्यादा निश्चित करू शकेल. त्यामुळे येथील नागरिकांचाही जनुकीय दोष कळण्यास सोपे जाणार आहे. जनुकीय चाचणीमुळे सध्या फेफडे, मणक्याचे रोग, मुलांचे कर्करोग ओळखता येतात. लहान बाळांचे आजारही यात समजू शकतात. सध्या एकाच वेळी २० हजार प्रकारच्या जनुकांची चाचणी करता येत असल्याचेही फडके यांनी सांगितले. सध्या सरकारकडून महागडय़ा अनुवांशिक आजारांवर उपचारासाठी मदत केली जात असून त्याचा गरिबांना लाभ होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘धोरण आवश्यक..’
जनुकीय चाचणीत मुलांना संभावित आजाराची माहिती आधीच कळू शकते. एखाद्या मुलाला गंभीर आजार संभावित असल्यास व तो २० वर्षांनी दगावणार असल्यास त्याची माहिती पालकांना द्यावी का? हा प्रश्न आहे. सोबत गर्भात बाळ असताना जनुकीय चाचणीत काही कमी-अधिक आढळल्यास संबंधित महिलेने गर्भपात करावा काय? तो किती आठवडय़ापर्यंत करावासह इतरही प्रश्न आहेत. त्यामुळे या चाचणीवर एक ठोस धोरण आवश्यक असल्याचेही डॉ. शुभा फडके म्हणाल्या.