डॉ. वर्षां भादीकर, डॉ. संदीप आप्पा यांची माहिती; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

नागपूर : दुर्गम, आदिवासी भागात वर्षांनुवर्षे सेवा देणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांनी आंदोलने केल्यानंतर शासनाने त्यांना स्थायी केले. परंतु, अद्यापही कुणालाच सेवाज्येष्ठतेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे सगळय़ांच्या पदोन्नत्या अडकल्या आहेत, अशी  महाराष्ट्र वैद्यकीय अधिकारी महासंघाचे राज्य प्रतिनिधी डॉ. संदीप आप्पा आणि जिल्हा अध्यक्ष डॉ. वर्षां भादीकर यांनी दिली.

लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते. यावेळी डॉ. संदीप आप्पा म्हणाले, राज्यातील आदिवासीबहुल, मागास व दुर्गम भागात सेवा देण्यासाठी आजही एमबीबीएस डॉक्टर तयार नसतात. त्यामुळे शासनाने ‘वर्ग अ’च्या सेवा नियमानुसार  अस्थायी बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची मोठय़ा प्रमाणावर नियुक्ती केली. हे डॉक्टर ज्या भागात सेवा देत आहेत तिथे पायाभूत सुविधा नाहीत. तरीही हे डॉक्टर प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहेत. या सगळय़ांना स्थायी करण्यासाठी वेळोवेळी आंदोलनेही झाल्याचे डॉ. संदीप आप्पा यांनी सांगितले.

डॉ. वर्षां भादीकर म्हणाल्या, आमदारांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळय़ांना बीएएमएस डॉक्टरांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवेदने दिली. त्यांची दखल घेत २०१९ मध्ये ७३८ वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायम केले गेले.  जुने २६७ अधिकारीही आरोग्य विभागात कार्यरत होते. या सगळय़ांना ‘गट अ’मध्ये सेवा समावेशनाचे आश्वासन मिळाले. परंतु पुढे काहीच झाले नाही. या घोळात एकाच पदावर राहून काही डॉक्टर निवृत्त झाले. त्यामुळे इतरांनीही सेवानिवृत्तीपर्यंत एकाच पदावर राहायचे काय, हा प्रश्न आहे. सगळय़ांना तातडीने पदोन्नती देऊन न्याय देण्याची मागणीही डॉ. भादीकर यांनी केली. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्याकडे २०१९ मध्ये आरोग्य मंत्रीपदाची जबाबदारी काही काळासाठी आली होती. त्यावेळी बीएएमएस डॉक्टरांच्या सेवा समावेशनाचा निर्णय झाला. आता ते मुख्यमंत्री झाल्याने त्यांच्याकडून बीएएमएस डॉक्टरांना खूप अपेक्षा असल्याचेही डॉ. भादीकर यांनी सांगितले.

दुर्गम गावातही चांगल्या सोयी हव्यात

डॉ. वर्षां भादीकर म्हणाल्या, राज्यातील काही आदिवासी पाडे, दुर्गम व मागास भागात आजही आवश्यक सुविधा नसल्याने नवीन एमबीबीएस डॉक्टर तिकडे जात नाहीत. तेथे बीएएमएस डॉक्टरच सेवा देतात. त्यातही येथे डॉक्टरांना राहण्यासाठी शासकीय घरे, वाहने नाहीत, मुलांसाठी चांगल्या शाळा नाहीत. तरीही बीएएमएस डॉक्टर तेथे सेवा देतात. करोना काळातही येथील सगळी व्यवस्था बीएएमएस डॉक्टरांनीच सांभाळली. त्यामुळे येथील डॉक्टरांसाठीही शासनाने चांगल्या सोयी निर्माण करण्याची गरज आहे.

नियुक्ती गट नुसार, सेवा समावेशन गट प्रमाणे

डॉ. संदीप आप्पा म्हणाले, या बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची अस्थायी संवर्गातील नियुक्ती ‘गट अ’ सेवा प्रवेश नियमानुसार झाली. त्यामुळे सेवा समावेशन ‘गट अ’नुसार अपेक्षित होते. आरोग्य सचिवांसोबतच्या बैठकीत यावर चर्चाही झाली. त्यावेळी तांत्रिक मुद्दे पुढे करत तुर्तास गट ब नुसार नियुक्ती घेत शासनाकडून पुढे गट अ मध्ये सगळय़ांना वर्ग केले जाणार असल्याचे कळवले गेले. त्यानुसार सगळय़ांनी सेवा समावेशन गट ब नुसार केले. परंतु आता सेवाज्येष्ठतेसह पदोन्नतीचा लाभ मिळत नसल्याने डॉक्टरांमध्ये रोष आहे.  पदोन्नती दिली तरी शासनावर काहीही आर्थिक भुर्दंड  येत नाही. सगळय़ांचे वेतन गट अ नुसारच आहे. त्यामुळे तातडीने सगळय़ांना न्याय देणे आवश्यक आहे.