चंद्रपूर : कुष्ठरोगाचे निर्मूलन झाले, या भ्रमात राज्य सरकार कुष्ठरोग विभाग बंद करीत आहे. मात्र, नवीन कुष्ठरुग्ण आजही आनंदवनात येत आहेत. इतक्या वर्षात कुष्ठरुग्णांना साधे आधार कार्ड मिळाले नाही. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांपासून त्यांना वंचित राहावे लागत आहे. कुष्ठरुग्णांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आनंदवनातील मुख्यमंत्री सभागृहात बाबा आमटे एकता अभियान ट्रस्टच्यावतीने बाबा आमटे जीवन गौरव व बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विकास आमटे होते. मंचावर भारत जोडो सायकल अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक ओ.पी.शहा, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, सत्कारमूर्ती आर. सुंदर सेन व राजकुमार सिन्हा, बाबा आमटे एकता अभियान ट्रस्टचे सचिव अशोक बेलखोडे, उपाध्यक्ष डॉ. सोमनाथ रोडे उपस्थित होते.

हेही वाचा… विदर्भात गारपीटीसह पावसाचे तांडव, आणखी दोन दिवस वादळी पावसाचा इशारा

भारत जोडो सायकल यात्रा भारतातील युवक-युवतींना घेऊन बाबा आमटे यांनी काढली. ते मृत्यूला कधी घाबरत नव्हते. भारत-पाकिस्तानमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण व्हावे, यासाठी ते पाकिस्तानला जाणार होते. भारत सरकारने परवानगी दिली. परंतु पाकिस्तानने परवानगी दिली नाही. त्यामुळे बाबांची इच्छा अपूर्ण राहिली, अशी आठवण डॉ. विकास आमटे यांनी सांगितली. मदुराई येथील ८१ वर्षीय आर. सुदर सेन यांना बाबा आमटे जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार जबलपूर येथील राजकुमार सिन्हा यांना सपत्निक प्रदान करण्यात आला. ५१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

तत्पूर्वी, वैष्णवी रणदिवे, उलका सायंकार, हर्षाली नासरे आणि मयूर धनदिवे या महाविद्यालयीन युवक-युवतींच्या हस्ते कर्मयोगी बाबा व साधनाताई आमटे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सोमनाथ रोडे यांनी तर संचालन अतुल शर्मा यांनी केले. आभार डॉ. अशोक बेलखोडे यांनी मानले.

हेही वाचा… आळंदी: छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप घालून योगी आदित्यनाथ यांचा सत्कार

त्यामुळेच विविध पदे मिळाली – डॉ. मेश्राम

एमबीबीएस पदवी घेतल्यानंतर सोमनाथ येथील श्रमसंस्कार शिबिरात प्रथमच सहभागी झालो. त्यानंतर आनंदवन परिवाराशी जुळलो व तो सहवास आजही कायम आहे. पहिल्यांदा मला महारोगी सेवा समितीचे विश्वस्त केले तेव्हा मोठा आनंद झाला. त्यामुळेच मला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थेची पदे मिळाली, असे मी मानतो, अशी भावना डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी यावेळी व्यक्त केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr vikas amte expressed strong opinion on leprosy department that closed despite eradication rsj 74 asj
First published on: 11-02-2024 at 12:05 IST