राज्य हौशी नाटय़ स्पर्धेची प्राथमिक फेरी उद्यापासून
सांस्कृतिक संचालनालयातर्फे ५५ वी महाराष्ट्र राज्य नाटय़ हौशी नाटय़ स्पर्धेची प्राथमिक फेरी ७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत नागपूर आणि इंदूरमधील नाटय़ संस्थांची एकूण १७ नाटके सादर होणार असून, रसिकांना नाटकांची मेजवानी मिळणार आहे.
सायंटिफीक सभागृहात होणाऱ्या या स्पर्धेला ७ नोव्हेंबरला प्रारंभ होणार असून, पहिल्या दिवशी वेल एन वेल पब्लिक स्कूल इंदूरचे अरविंद लिमये यांच्या ‘एका उत्तराची कहाणी’ या नाटकाने प्रारंभ होणार आहे. ३ डिसेंबरला स्पर्धाचा समारोप होईल आणि त्यानंतर तीन दिवसात निकाल घोषित होईल. १० नोव्हेंबरनंतर जवळपास १२ दिवस नाटक विश्रांती देण्यात आली असून, त्यानंतर पुन्हा २१ नोव्हेंबर पासून स्पर्धा सुरू होऊन उर्वरित नाटके सादर होतील.
या स्पर्धेत ८ नोव्हेंबरला जयदेव (विठ्ठलराव खोब्रागडे शिक्षण विकास संस्था), ९ नोव्हेंबर- आशा नाम मनुष्य नाम (वत्सल क्रिएशन सांस्कृतिक मंडळ), १० नोव्हेंबर- अन्नदाता सुखी भव (टिळकनगर महिला मंडळ नाटय़तरंग विभाग), २१ नोव्हेंबर सापत्नेकराचे मूल (तेजस्विनी संस्था), २२ नोव्हेंबर- जिवलगा (सातपुडा एज्युकेशन संस्था), २३ नोव्हेंबर – नकोत नुसत्या भिंती (रंगभूमी ), २४ नोव्हेंबर- पंखाना ओढ पावलांची (प्रयास नाटय़ संस्था इंदूर), २५ नोव्हेंबर- काही तरी करा रे (नाटय़भारती इंदूर), २६ नोव्हेंबर – तिस तेरा (नक्षत्र बहुउद्देशीय संस्था नागपूर), २७ नोव्हेंबर – अनंताचे प्रवासी (महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्रा नागपूर), २८ नोव्हेंबर – मी इतिहास गाडला नाही (मित्र परिवार मंडळ नागपूर), २९ नोव्हेंबर- गंथाडवाडी (एकलव्य युवा बहुउद्देशीय संस्था, नागपूर), ३० नोव्हेंबर- टाडा एन बेवारटोला (डॉ. राजेंद्र प्रसाद युवा कल्याणकारी संस्था, नागपूर), १ डिसेंबर- मै फिर लौट आऊंगा (बहुजन रंगभूमी), २ डिसेंबर- कालचक्र (अविरत इंदूर) आणि ३ डिसेंबर – मिच्च काळ्या रंगामध्ये बुडवून (अ‍ॅम्यच्युअर आर्टिस्ट कम्बाईन, नागपूर) ही नाटके सादर होणार आहेत.