नागपूर : वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर ऑटो उभे करणे,  वाहतूक नियमांचे पालन न करणे, प्रवासी गोळा करण्यासाठी दमदाटी करणे, अवाजवी दर आकारणे, अशा अनेक तक्रारी ऑटोचालकांविषयी  असून त्यांच्या अरेरावीला  आवार कोण घालणार, असा सवाल  आता  नागपूरकर विचारू लागले आहेत.

महापालिकेची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने शहरात खासगी वाहने आणि ऑटोतून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. विविध कार्यालयांमध्ये जाणारे कर्मचारी असो किंवा बाहेरगावाहून नागपुरात येणारे नागरिक असो, त्यांना ऑटोशिवाय  पर्याय नाही. याचा फायदा घेत शहरातील ऑटोचालकांची मनमानी वाढली आहे. काही ऑटोचालक मात्र याला अपवाद आहेत.

 शहरातील विविध ऑटो स्टॅण्ड आणि प्रमुख चौकांमध्ये फेरफटका मारला असता  अनेक ठिकाणी ऑटोचालकांची मनमानी दिसून आली.  विशेषत: वाहतूक पोलिसांचे याकडील दुर्लक्ष आश्चर्यकारक आहे. याचा फटका गरजू प्रवाशांना बसताना दिसतो.  बर्डी, अमरावती मार्ग, झाशी राणी चौक, मेट्रोस्थानकाजवळ, बर्डी पोलीस ठाण्याजवळ, मेडिकल चौक, बसस्थानक, रेल्वेस्थानक, एनआयटी कार्यालयाजवळील आटो स्टॅण्डची पाहणी केली असता  प्रवासी मिळवण्यासाठी ऑटोचालक अक्षरक्ष: दादागिरी करताना दिसले. अनेकदा महिला प्रवाशांवर शेरेबाजीही केली जाते.

रहाटे कॉलनी, कृपलानी टी पॉईंट, इंदोरा चौक, पाचपावली चौक, महाल, कॉटन मार्केट, शनिवारी बाजार, अग्रेसन चौक, हिंगणा टी पॉईंट, धंतोली, यशवंत स्टेडियम, एमआयडीसी, वाडी चौक, अंबाझरी, सेमीनरी हिल्स, कामठी रोड यासह इतरही ठिकाणी ऑटोचालक प्रवासी वाहतूक करतात.  प्रवाशांकडून अवाजवी भाडे घेतले जाते. नकार दिला तर वाद घातला जातो.  प्रवासी मिळवण्यावरून अनेकदा ऑटोचालकांमध्येच वाद होतात. पोलीस कारवाई करीत नसल्याने त्यांना भीतीही उरलेली  नाही. बर्डीवर तर रस्त्यावरच ऑटो उभे केले जातात. इतर वाहनांना त्याची  अडचण होते. वाहतूक नियम आपल्यासाठी नाही अशाच अविर्भावात आटोचालक वागत असल्याच्या भावना अनेक प्रवाशांनी  व्यक्त केल्या. या  अरेरावीला लगाम घालण्याची मागणी त्यांनी केली.

तक्रारी काय?

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी

ऑटो अजूनही मीटरप्रमाणे धावत नाहीत. पण, पोलीस कारवाई होऊ नये यासाठी मीटर सुरूच ठेवतात. मनमानी भाडे आकारले जाते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले जातात.

 – अश्वजीत वानखेडे (हुडकेश्वर) 

पोलिसांचा धाक उरला नाही 

ऑटोचालकांना पोलीस आणि कायद्याचा धाक उरला नाही. पोलिसांवर हात उगारण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. नियम मोडताना दिसत असूनही वाहतूक पोलीस कारवाई करीत नाहीत.  

– राजेश पावणे (अजनी)

महिलांसोबत असभ्य वागणूक

महिला प्रवाशांसोबत ऑटोचालकांची वागणूक योग्य नसते.  गरजू महिलांकडून अधिक भाडे वसूल केले जाते. विरोध केल्यास किंवा ऑटोत बसण्यास नकार दिला तर शेरेबाजी केली जाते. यावेळी इतर ऑटोचालक हसत असतात. ऑटोचालकांची महिलांना भीती वाटते. 

– रिया जगताप (महाल)

‘ते’ ऑटोचालक परवाना नसलेले

अरेरावी करणारे ऑटोचालक हे विनापरवाना आणि विना बँचने ऑटो चालवतात. त्यांचे पोलिसांशी संगनमत असते. त्यामुळे पोलीस अरेरावी करणाऱ्या ऑटोचालकांवर कारवाई करीत नाहीत.  प्रवाशांना त्रास होत असेल तर  पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.

– विलास भालेराव, अध्यक्ष, विदर्भ ऑटोचालक फेडरेशन.

नियमित कारवाई

सीताबर्डी वाहतूक पोलिसांची ऑटोचालकांवर कारवाई सुरू आहे. गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस कर्मचारीसुद्धा तैनात करण्यात आले आहेत. वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून लोखंडी कठडे लावण्याचा प्रस्ताव असून ऑटोचालकांची सोय करून देणार आहे. कोणी नियम मोडत असेल तर ऑटो जप्त केला जाईल. 

– अमित डोळस, प्र. सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग.