दिव्यांग आजारी मुलीला उपचारासाठी नेण्याकरिता आगार व्यवस्थापकाने रजा न दिल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत एका चालकाने मुलीचा मृतदेह थेट आगारात आणला. राज्य परिवहन मंडळाच्या दिग्रस आगारात आज गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली.

दिग्रस आगारात चालक असलेले किशोर राठोड यांची चौदा वर्षाची दिव्यांग मुलगी नेहमी आजारी राहायची. त्यामुळे तिला दवाखान्यात उपचारासाठी नेण्याकरिता चालक राठोड यांनी दिग्रसचे आगार प्रमुख संदीप मडावींना रजा देण्याची विनंती केली. मात्र आगार व्यवस्थापकाने रजा न दिल्यामुळे मुलीला उपचारासाठी घेऊन जाऊ शकलो नाही. त्यामुळे योग्य उपचाराअभावी तिचा मृत्यू झाल्याचा आरोप राठोड यांनी केला. मुलीच्या मृत्यूस आगार व्यवस्थापक जबाबदार असल्याचा आरोप करीत किशोर राठोड यांनी मुलीचा मृतदेह ऑटोने थेट दिग्रस आगारात आणला. त्यामुळे आगारात खळबळ उडाली.

दरम्यान, दिग्रस पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी आगारात धाव घेतली. पोलिसांनी राठोड दाम्पत्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र जोपर्यंत आगर व्यवस्थापक आणि सतत मानसिक त्रास देणाऱ्या अन्य अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मुलीचा मृतदेह उचलणार नाही, असा संतप्त पवित्रा राठोड यांनी घेतला.

राठोड यांना अन्य कर्मचाऱ्यांनीही साथ दिली. त्यामुळे पोलिसही हतबल झाले होते. सायंकाळी उशीरापर्यंत या प्रकरणी कोणावरही कारवाई झाली नव्हती.