scorecardresearch

एकाच दिवशी गुंडाच्या तीन टोळय़ांवर मोक्का

शहरातील कुख्यात गुंडांच्या तीन टोळय़ांवर एकाच दिवशी मोक्का लावण्यात आला.

ड्रग्स माफिया आबूच्या टोळीचा समावेश

नागपूर : शहरातील कुख्यात गुंडांच्या तीन टोळय़ांवर एकाच दिवशी मोक्का लावण्यात आला. ही आक्रमक कारवाई पोलीस आयुक्तांनी मंगळवारी केली. अंमली पदार्थाचा तस्कर आबू ऊर्फ फिरोज खान याच्या टोळीचाही समावेश आहे. आबू ऊर्फ फिरोज खान याच्यावर अंमली पदार्थाची तस्करी, जमिनी हडपणे असे अनेक गुन्हे दाखल आहे. यापूर्वी त्याच्यावर आणि त्याच्या टोळीतील शहजाद खान अजीज खान, अमजद खान अजीज खान, इग्मा खान अजीज खान (मोठा ताजबाग) यांच्यावर मोक्काची कारवाई करण्यात आली होती. सध्या ते मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहेत. त्यांची गुन्हेगारी लक्षात घेता त्यांच्या मोक्काच्या शिक्षेत वाढ करण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी तसा प्रस्ताव अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) सुनील फुलारी यांच्याकडे सादर केला होता.

त्याचप्रमाणे मुलांना वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक पालकांची फसवणूक करणाऱ्या दाभा येथील चंद्रशेखर पंजाबराव आत्राम व त्याच्या टोळीवर मोक्काच्या शिक्षेत वाढ करण्यात आली. चंद्रशेखर आत्राम व त्याचे सहकारी राजेश कमलेश गुहा, पंकज कृपांशकर दुबे, श्रीकांत ऊर्फ अभिमन्यू सिंग, नीळकंठ सूर्यवंशी, पिंकू, मनू प्रतापन, लोकप्रिय उद्धवराव साखरे यांनी स्वत:च्या फायद्यासाठी अनेकांना वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देतो असे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केली होती. याप्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. सध्या आरोपी कारागृहात आहेत.

दरोडेखोरांवर मोक्का

नागपूरसह अन्य राज्यात दरोडा घालून पोलिसांना त्रस्त करणाऱ्या चंगीराम ऊर्फ चंगी शंकर गुसई (५५, रायसेन-मध्यप्रदेश) याच्या टोळीवर देखील मोक्काची कारवाई करण्यात आली. चंगीरामच्या टोळीने गिट्टीखदान हद्दीत आणि २ ठिकाणी आणि बेलतरोडीत दरोडा घालून ऐवज लुटून नेला होता. गुन्हे शाखा पोलिसांनी त्याच्या टोळीतील इतर सदस्यांना उत्तर प्रदेश येथून अटक केली होती. त्याचप्रमाणे लुटीचा माल त्यांनी सराफा प्रवीण परसराम कन्होले (फागो ले आऊट गोधनी) आणि संदेश अन्नाजी रोकडे (चक्की खापा) यांना विकला होता. पोलिसांनी कन्होले आणि रोकडे या सराफांना देखील अटक केली होती. चंगीराम आणि त्याच्या अन्य पाच साथीदारांवर पोलिसांनी मोक्काची कारवाई केली.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Drugs mafia three gangs police ysh

ताज्या बातम्या